आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडीचे अर्धशतक! परळी वीज केंद्रही पाण्यावर अवलंबून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण- माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या पुढाकारातील पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाला रविवारी (दि. १८ ऑक्टोबर २०१५) रोजी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. १८ ऑक्टोबर १९६५ रोजी जायकवाडी प्रकल्पाचे भूमिपूजन लालबहादूर शास्त्री यांच्या हस्ते झाले होते.

शंकरराव चव्हाण यांनी या वेळी हा प्रकल्प मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवणारा ठरणार व सिंचनासाठीच याची निर्मिती करण्यात येत असल्याचे सांगितले होते. मात्र, सिंचनाचा उद्देशच बदलला असून पाणीवाटपाचा प्राधान्यक्रम बदलल्याने आता फक्त पिण्याच्या पाण्यासाठीच धरण असे चित्र जायकवाडीच्या वरील भागात धरणे बांधली गेल्याने निर्माण झाले आहे. शंकररावांचे पुत्र माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीदेखील ही बाब मान्य केली. पन्नास वर्षांच्या काळात धरणाच्या पट्ट्यातील दीड लाख हेक्टरांवर शेती ओलिताखाली येत गेली. मात्र, मागील चार वर्षांत जायकवाडीचा पाणीसाठा वाढला नसल्याने जायकवाडी धरणाची मूळ संकल्पना मागे पडते की काय, अशी परिस्थिती दिसून येत आहे.

पहिले मातीचे धरण
आशिया खंडातील पहिले मातीचे धरण, अशी ओळख असलेल्या जायकवाडी धरणाच्या पाण्यावर मराठवाड्यातील साडेतीनशे गावांची तहान भागली जाते. चार हजार उद्योग, १ लाख ८३ हजार ३२२ हेक्टर शेतीचे क्षेत्र जायकवाडीच्या पाण्यावर अवलंबून आहे. औरंगाबाद, जालना, नगर, परभणी, बीड या जिल्ह्यांतील शेतीला धरणातून पाणी दिले जावे, यासाठी पैठणचा डावा कालवा २०८ किमी, तर उजवा कालवा १३२ किमी असे दोन कालवे जायकवाडीवर आहेत. यामुळे मराठवाड्यातील शेतकरी खऱ्या अर्थाने सधन झाला. परंतु या पंधरा वर्षांत जायकवाडीच्या पाण्याचा प्राध्यान्यक्रम बदलल्याने आता पहिले पाणी पिण्यासाठी, नंतर उद्योगासाठी.

चार हजार उद्योगांना पाणी
औरंगाबाद, पैठण, जालना जिल्ह्यातील चार हजार उद्योगांना जायकवाडी प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. यात बिअर कंपन्यांसह, बजाज, गरवारे, शेंद्रा स्कोडा केमिकल कंपन्यांचा समावेश आहे. जायकवाडीवरच उद्योगाची मदार असून कामगारांचा तो आधारवड ठरला आहे.

मोठा पूर
ऐतिहासिक पुराची नोंद ऑगस्ट २००६ मध्ये झाली. ३ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट २००६ दरम्यान एका दिवसात ८५ मिमी ते २५५ मिमी एवढी पावसाची नोंद धरणाच्या वरील भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे झाली. अतिवृष्टी सलग पाच दिवस राहिल्याने धरणात येणाऱ्या पुराच्या पाण्याची आवक ३.५० लाख क्युसेक होती.

जायकवाडी प्रकल्प
धरणाचे पाणलोट क्षेत्र २१७५० चौकिमी
एकूण जलसाठा २९०९ दलघमी
उपयुक्त पाणीसाठा २१७१ दलघमी
मृत पाणीसाठा ७३८ दलघमी
जलशयातील बुडीत क्षेत्र ३५०० हेक्टर
जलाशयामुळे विस्थापित गावे ११८
पाण्याखाली येणारे शेतीचे क्षेत्र १८३३२२ हेक्टर

तीस लाख लोकांची तहान
जायकवाडी धरणामुळे औरंगाबाद, जालना, गेवराई, पैठण, शेवगावसह चारशे गावांना पाणीपुरवठा होतो. साधारण तीस लाखांहून अधिक नागरिकांची रोजची तहान या धरणाच्या पाण्यावर भागवली जाते.

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी
जायकवाडी प्रकल्पामुळे उद्योग, शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी झाला आहे. या प्रकल्पाला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत.
- अशोक चव्हाण, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग.
बातम्या आणखी आहेत...