आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यातील दोन लाख हेक्टर शेती तीन वर्षांनंतर येणार ओलिताखाली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण- जायकवाडी धरणाच्या पाण्यावर मराठवाड्यातील शेतीसह पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. आठ वर्षांनंतर यंदा प्रथमच १४ मार्चलाच जायकवाडी मृतसाठ्यात आल्याने पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता, तर मागील चार वर्षांपासून धरण उन्हाळ्यात मृतसाठ्यात आले. त्यामुळे जो सिंचनाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या धरणाची निर्मिती झाली तो उद्देशच बाजूला राहिला.

यंदा मात्र धरणाचा पाणीसाठा या आठ दिवसांतच ३७ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. आणखीदेखील वरील धरणातून आवक सुरू असल्याने हा साठा ५० टक्क्यांपुढे जाणार असल्याने यंदा पिण्याच्या पाण्यासह शेतीसिंचनाचा प्रश्न मिटणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.

जायकवाडी धरणाच्या पाण्यावर मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांतील १,८३,३२२ हेक्टर शेती ओलिताखाली येते. गेल्या तीन वर्षांपासून धरणाच्या पाणीसाठ्यात विशेष वाढ न झाल्याने सलग तीन वर्षे धरणातील पाणी फक्त पिण्यासाठीच राखीव ठेवण्यात आले होते. यामुळे ज्या उद्देशाने धरणाची निर्मिती केली तो उद्देश मागे पडल्याची ओरड शेतकऱ्यांत झाली.

धरणावरील शेतकऱ्यांच्या कृषीच्या मोटारी जप्त करण्यात आल्या. काही शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांत एकच रोष निर्माण झाला होता. आमच्या जमिनी धरणात गेल्या व आमच्यावर गुन्हे दाखल करतात, आधी उद्योगाचे पाणी बंद करा अशी मागणी या दोन वर्षांत मोठ्या प्रमाणावर समोर आली होती. मात्र, धरणातच पाणी नसल्याने प्रशासन हातबल झाले होते. परंतु यंदा नाशिक भागात जोरदार पाऊस झाल्याने ते पाणी जायकवाडीत मोठ्या प्रमाणात दाखल होऊन आजघडीला जायकवाडीचा पाणीसाठा ३७ टक्क्यांवर असून यात आणखी वाढ होणार असल्याने या वर्षी शेतीला पाणी देणे शक्य होणार आहे. पाणी देण्याचा नियम जायकवाडीचा पाणीसाठा ३३ टक्क्यांपुढे असला की शेतीला कालव्याद्वारे पाणी देण्याचा नियम असून सध्या ३३ टक्क्यांच्या पुढे पाणीसाठा झाला आहे.

वर्षभराचा प्रश्न मिटला
धरणातून मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, अंबडसह चारशे गावांना पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. जायकवाडीचा साठा वाढल्याने वर्षभर तरी औरंगाबाद, जालन्याला पिण्याच्या पाण्याची अडचण भासणार नाही.

२ कालव्यांद्वारे होतो पुरवठा
जायकवाडीच्या धरणावर डावा व उजवा असे दोन कालवे असून डावा कालवा हा २०८ किमी आहे. याची वहन क्षमता १००.०८ घमी प्रति सेकंद आहे. यावर औरंगाबाद, जालना, परभणी जिल्ह्यातील १,४१,६४० हेक्टर शेती ओलिताखाली येते, तर उजवा कालवा १३२ किमी लांबीचा असून याची वहन क्षमता ६३.७१ घमी प्रतिसेकंद असून याच्या पाण्याखाली नगर, औरंगाबाद, बीड जिल्ह्यातील ४६,६४० हेक्टर शेती ओलिताखाली येते.

महसूल मिळणार
तीन वर्षांपासून शेतीला पाणी देता न आल्याने पाटबंधारे विभागाला पाणीपट्टीवर पाणी सोडावे लागले होते. आता शेतीला पाणी देता येणार असल्याने विभागाला यातून चांगला महसूल मिळेल.

शेतीला पाणी देणे शक्य
> जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ३३ टक्क्यांपुढे आला तर शेतीला पाणी देण्याचा नियम असल्याने यंदा शेतीला पाणी देणे शक्य होणार आहे.
-अशोक चव्हाण, शाखा अभियंता

> मराठवाड्यातील शेती जायकवाडीच्या पाण्यावर ओलिताखाली येते. सलगच्या दुष्काळाने तीन वर्षांपासून धरणाचे पाणी मिळाले नाही. शेतीच्या उत्पन्नात वाढ होईल.
- अप्पासाहेब निर्मळ, शेतकरी नेते, पैठण.

चार हजार उद्योगांना फायदा :
धरणाची निर्मिती ही शेतीला पाणी या उद्देशाने झाली असली तरी या पाण्यामुळे औरंगाबादला उद्योग क्षेत्राची भरभराट झाली. त्यात जायकवाडी मृतसाठ्यात आल्याने उद्योगाची पाणी कपात करण्यात येत होती. आता ती रद्द करण्याची शक्यता असून त्यावर निर्णय झालेला नसला तरी उद्योगाला या पाणीवाढीचा फायदा झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...