आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैठणमधील बलात्काराचा तपास सीआयडीकडे द्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पैठण तालुक्यातील तुळजापूर येथील सहावर्षीय बालिकेवर बलात्कार करणार्‍या नराधमाला कठोर शिक्षा देण्याची मागणी एमआयटीच्या विद्यार्थ्यांनी केली आहे. प्रकरणाचा तपास तीनच दिवसांत सीआयडीकडे दिला नाही तर शहरातील सर्व महाविद्यालये बंद करण्याचा इशाराही विद्यार्थ्यांनी दिला आहे. मंगळवारी (3 सप्टेंबर) विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना यासंदर्भात निवेदनेही दिली आहेत.

माणुसकीला काळिमा फासणार्‍या या घटनेचा निषेध करण्यासाठी मंगळवारी अचानक विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक कार्यालय गाठले. एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह शेकडो जण उत्स्फूर्तपणे जमा झाले. विद्यार्थ्यांनी समाजिक बांधिलकी म्हणून दोन्ही अधिकार्‍यांच्या भेटी घेतल्या. बालिकेच्या माता-पित्यांना संरक्षण देण्यात यावे, त्याशिवाय गुन्ह्याचा तपास सीआयडीद्वारे करून घेण्यात यावा आणि आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली. तीन दिवसांत सर्व मागण्या मंजूर करण्यात आल्या नाही तर शहरातील सर्व शाळा -महाविद्यालये बेमुदत बंद पाळून शैक्षणिक बहिष्कार पुकारण्यात येणार असल्याचा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला आहे.

विष्णू गायकवाड, शिवाजी हिवाळे, हनुमान शिंदे, योगेश गव्हाणे, सागर शिंदे, प्रियंका जाधव, सायली जोशी, तुषार आव्हाळे आणि उमेश बागूल आदींनी आंदोलनात भाग घेतला.