आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Paithan Road Become Four Lane, Work Starts Within Four Months

पैठण रस्ता होणार चौपदरी, चार महिन्यांत कामाला सुरूवात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - खड्डे आणि अपघातांमुळे चर्चेत राहिलेल्या पैठण मार्गावर वाहन चालवणे आता सुलभ होणार आहे. मागील सहा वर्षांपासून रखडलेल्या या रस्त्याच्या चौपदरीकरणाची निविदा प्रक्रिया डिसेंबरअखेरीस पूर्ण होणार असून चार महिन्यांनंतर प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होणार आहे. विशेष म्हणजे, नवीन प्रस्तावातून भूसंपादन प्रक्रिया वगळण्यात आल्याने या वेळी हे काम सुरू होण्यास कोणताच अडथळा राहिलेला नाही.
पैठणला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्यानंतर औरंगाबाद ते पैठण या रस्त्याच्या चौपदरीकरणाची निविदा 27 ऑक्टोबर 2008 रोजी काढण्यात आली. ही निविदा 179.25 कोटी रुपयांची होती. या कामासाठी 11 कंत्राटदारांनी निविदा सादर केल्या होत्या. त्यापैकी आठ उद्योजकांच्या पूर्वअर्हता निवड सूचीस शासनाने 16 जून 2010 रोजी मान्यता दिली होती. इंदूरच्या के.टी.कन्स्ट्रक्शन (आय) यांच्या निविदेस मंजुरी देण्यात आली होती. संबंधित निविदेत कंत्राटदाराने एकूण प्रकल्प किंमत 210.28 कोटी आणि शासन सहभाग देकार 94.40 कोटींसह सवलतीचा कालावधी वीस वर्ष नमूद केला होता. या कामात कंत्राटदाराचा शासन सहभाग देकार 40 टक्के पेक्षा जास्त असल्याने ती निवीदा रद्द करण्याचा निर्णय 4 मे 2011 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्र्यांनी घेतला आणि फेर प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जागतिक बँक प्रकल्प विभागाने प्रस्तावात बदल करून त्यास मंजुरी घेतली. शासनाच्या सूचनेनुसार वाल्मीचा रस्ता चौपदरीऐवजी दुहेरीकरण करून त्याचे कॉंक्रीटीकरण करण्याची नव्याने तरतूद करण्यात आली. त्यामुळे वाल्मीच्या रस्त्याचे भूसंपादनाचा विषय निकाली निघाला आहे. या कामाची निविदा 23 डिसेंबर रोजी उघडण्यात येणार असून, पाच सदस्यीय समितीच्या बैठकीत कंत्राटदार निश्चित केला जाईल. या रस्त्यासाठी टोल आकारला जाणार आहे.
चौकट....ऊस उत्पादकांना होईल फायदा
पश्चिम महाराष्‍ट्राशी हा रस्ता जोडला जाणार असल्याने ऊस उत्पादक शेतक-यांना फायदा होईल. चितेगाव आणि पैठण एमआयडीसीची भरभराट होऊन नवे उद्योग उभे राहतील.
कमी वेळेत प्रवास शक्य होऊन अपघाताची मालिका खंडीत होईल.
पैठणच्या विकासात भर पडेल.
निविदेतील अटीनुसार टोल
निविदेतील अटीप्रमाणे कंत्राटदाराने 75 टक्के रस्त्याचे काम पूर्ण केल्यानंतर या रस्त्यावरील टोलवसुली सुरू होईल. या रस्त्याची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी कंत्राटदारावर असून या मार्गावर 25 वर्षे वाहनचालकांकडून टोल वसूल केला जाणार आहे.