औरंगाबाद - सोलापूर -जळगाव या नियोजित रेल्वेमार्गाच्या प्रश्नावर ठोस निर्णय घेण्यासाठी औरंगाबाद व जालना या दोन्ही जिल्ह्यांतील प्रत्येकी पाच सदस्यांची समिती नेमून केंद्रीय रेल्वेमंत्री व बोर्डाकडे पाठपुरावा केला जाणार असल्याची ग्वाही खासदार रावसाहेब दानवे यांनी पैठण येथून आलेल्या सर्वपक्षीय रेल्वे संघर्ष समितीशी चर्चा करताना सोमवारी दिली. परंतु चर्चा करण्यासाठी आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे खासदार दानवे यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने त्यांना घेराव घालून प्रश्नांचा भडिमार केला होता. या वेळी जालनेकर व पैठणकर समोरासमोर असल्याचे चित्र प्रथमच पाहायला मिळाले. या वेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
याअगोदर संतोष तांबे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांनी या प्रश्नावर औरंगाबाद येथील सुभेदारी विश्रामगृहावर कार्यकर्त्यांसोबत येत जोरदार घोषणाबाजी केली. प्रस्तावित रेल्वेमार्गावरून दोन्ही जिल्ह्यांतील जनतेत उलटसुलट पडसाद उमटू लागल्याच्या पार्श्वभूमीवर जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार रावसाहेब दानवे यांनी पैठणच्या आंदोलकांशी चर्चेचा निर्णय घेतला. त्यानुसार सोमवारी अनेक कार्यकर्ते औरंगाबादेतील सुभेदारी विश्रामगृहावर पोहोचले होते. मात्र वेळ देऊनही खासदार दानवे तेथे उपस्थित नसल्याने मराठवाडा रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष ओमप्रकाशवर्मा, सुधाकरनाना चव्हाण यांनी आंदोलक कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
मात्र, याच वेळी जालना जिल्ह्यातून आलेल्या दहा ते पंधरा कार्यकर्त्यांनी सभागृहात प्रवेश करून गोंधळ घालण्याचा केलेला प्रयत्न पैठणच्या कार्यकर्त्यांनी रेेल्वे समर्थनार्थ घोषणाबाजी करत उधळून लावला. तर हा प्रकार सुरू असतानाच खासदार दानवे सुभेदारीवर दाखल झाले व रेल्वे पळवल्याच्या मुद्द्याचे खंंडन करत पैठणच्या कार्यकर्त्यांशी त्यांनी चर्चा केली. तसेच लवकरच याबाबत वाद निकाली काढून पैठणमधून रेल्वेमार्ग जाण्यासाठी केंद्र स्तरावर
आपण प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. परंतु सर्वपक्षीय पदाधिका-यांचे समाधान झाले नाही.
या पदाधिका-यांनी घेतली दानवेंची भेट
शिवाजी नागरी बँकेचे चेअरमन रवींद्र काळे, माजी आमदार संजय वाघचौरे, नगराध्यक्ष दत्ता गोर्डे, माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी, जयाजीराव सूर्यवंशी, पाशा धांडे, भिकाजी आठवले, अंबादास ढवळे, रावसाहेब नाडे आदींनीही खासदार दानवेंची भेट घेऊन रेल्वेप्रश्नी पैठणची बाजू मांडली. या शिष्टमंडळात क्रांती सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष तांबे, नितीन देशमुख, साईनाथ कासोळे उपस्थित होते.
आरोप खोटेच
पैठणचा रेल्वे मार्ग बदलून भोकरदनला नेला हा खोडसाळपणाचा आरोप आहे. यात माझा काहीही संबंध नाही. तरीही पैठणकरांच्या काही शंका असतील तर त्यांना बरोबर घेऊन रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढण्यात येईल.
रावसोहब दानवे, खासदार