आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Cricket Match Against India News In Marathi

अनेकांनी लग्न मुहूर्त टाळून लुटला क्रिकेटचा आनंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- संपूर्ण क्रीडा जगताचे लक्ष लागलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट मॅचमुळे शहरातील अनेक लग्नांचे मुहूर्त हुकले. नवरदेवाकडील मित्रमंडळी ही महत्त्वाची क्रिकेट मॅच सोडून नवरदेवासमोर नाचायला पहिल्यांदा उत्सुक नव्हती. आधी मित्र, नंतर इतर कामे असा विचार करणारे मित्रच उशिरा मंडपात दाखल झाल्याने अनेकांचे मुहूर्त हुकल्याचे दिसून आले.
रविवारचा सुटीचा दिवस. मुहूर्तही चांगला असल्याने अनेकांनी याच दिवशी दुपारच्या १२-१२.३० वाजेच्या शुभ मुहूर्तावर लग्न काढले. वरातीमध्ये नाचायलाच कोणी नसले तर मजा काय! मात्र, क्रिकेट पाहण्यात दंग झालेले नवरदेवाचे मित्रच वेळेवर उपस्थित नव्हते. भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाविरुद्ध मॅच म्हटली तर चाहत्यांच्या आनंदाला विचारता सोय नसते. रविवारी दुपारच्या वेळी शहरात अक्षरश: अघोषित संचारबंदी लागल्याचे दिसून आले. लग्नाच्या ठिकाणी वयस्क मंडळी वगळता धिंगाणा घालणारी युवकांची फौज गायब होती. सकाळी ९.३० वाजता सुरू झालेल्या मॅचचा भारताचा डाव दुपारी १ वाजता संपला. त्यानंतर नवरदेवाची मित्रमंडळी घराबाहेर पडू लागली. त्यामुळे पुन्हा वरात फिरवून येईपर्यंत अनेकांचे मुहूर्त हुकले. पुन्हा पाकिस्तानच्या डावाचे वेध लागले असल्याने ते एकमेकांना स्कोअर विचारत होते आणि सतत मोबाइलवर पाहत होते. काही ठिकाणी रस्त्याच्या कडेवरील दुकानांमध्ये अनेक जण जाऊन स्कोअर पाहताना दिसत होते. सर्वत्र केवळ क्रिकेटचाच बोलबाला होता. सायंकाळी भारताने पाकिस्तानला नमवून चाहत्यांना पुन्हा आनंदाची संधी दिली. शहरात फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशांवर अनेक चौकांत क्रिकेटवेडे नाचताना दिसले.