आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Palashi Sarpanch Dead In Road Accident Aurangabad

खासगी बसच्या धडकेत पळशीचे माजी सरपंच ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जळगाव रोडवरील आंबेडकरनगर चौकात खासगी बस आणि दुचाकीत झालेल्या अपघातात पळशीचे माजी सरपंच तथा देवगिरी सहकारी कारखान्याचे माजी संचालक काशीनाथ केशव पळसकर (70) शुक्रवारी (27 डिसेंबर) ठार झाले. हा अपघात दुपारी 1.45 वाजता झाला. रस्ता ओलांडताना पळसकर यांच्या दुचाकीला हर्सूलकडे जाणार्‍या बसने उडवले. बसचालक शकीलमियाँ सय्यद (रा. हडपसर, पुणे) यास सिडको पोलिसांनी अटक केली.

मागील महिन्यात अनिल लोखंडे यांच्या अपघाती निधनानंतर त्याच ठिकाणी पुन्हा एका ज्येष्ठ नागरिकाला आपले प्राण गमवावे लागले. पुणे येथील ट्रॅव्हल्स बस (एमएच 12 एफसी 3301) हर्सूल टी पॉइंटच्या दिशेने भरधाव जात होती. बँकेचा हप्ता भरण्यासाठी पळसकर जात होते. प्रत्यक्षदश्रींनी दिलेल्या माहितीनुसार रस्ता ओलांडताना त्यांच्या दुचाकीला (एमएच 20 बीयू 5080) ट्रकने उडवले अन् सुमारे पंधरा फुटांपर्यंत ट्रकने त्यांना फरपटत नेले.

त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे त्यांना अँपेक्स हॉस्पिटल आणि नंतर घाटीत दाखल केले. मात्र, अति रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचे घाटीत निधन झाले. बसमध्ये 25 जण प्रवास करत होते, शनिवारी होणार्‍या विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नातेवाइकांनी ही बस भाड्याने घेतली होती. अपघातानंतर पोलिसांनी बस ताब्यात घेतल्यामुळे त्यांना पर्यायी व्यवस्था करावी लागली. तपास सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठलसिंग राजपूत करत आहेत.

सिग्नल बसवून वाहतूक पोलिस नेमावा
याच ठिकाणी अपघातात अनेक जणांचा मृत्यू होतो. वाहतुकीला शिस्त लागावी म्हणून चौकात सिग्नल बसवण्याची मागणी असून कायमस्वरूपी वाहतूक पोलिस नेमणे गरजेचे आहे.- दीपक गवळी, आंबेडकरनर

भरधाव वेगाने वाहने चालवणार्‍या वाहनधारकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करावी, जेणेकरून वाहनधारक वाहन सावकाश चालवतील. राहुल पाटील, नागरिक

गावची कर्ती व्यक्ती गेली
के. के. पळसकर यांनी सार्वजनिक जीवनात अनेक पदे भूषवली. अनेक वर्षे गावचे सरपंच म्हणून त्यांनी काम पाहिले. देवगिरी सहकारी बँकेचे संचालकपद, गावचे पोलिस पाटील, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती आणि विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदीही त्यांनी काम केले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, दोन मुले आणि नातवंडे असा परिवार असून सायंकाळी सहानंतर त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले.