आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठाचा पाली विभाग करणार भाषा व्यवहार कोश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पाली व बुद्धिझम विभागात लवकरच पाली भाषा व्यवहार कोश तयार केला जाणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोगाकडे (यूजीसी) पाठवण्यात आला आहे. या कोशामुळे सर्वसामान्यांनाही पाली शिकणे सोपे होणार आहे, असे विभागाचे प्रमुख डॉ. मनीष आनंद यांनी सांगितले.

विद्यापीठाच्या भाषा विभागांमध्ये आता परिवर्तन करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांमध्ये या भाषा विभागांचे महत्त्व, त्यातील संधी यांची माहिती नसल्यानेच आज या विभागांमध्ये विद्यार्थी संख्या कमी होताना दिसते. एकेकाळी विद्यार्थ्यांना सर्वच भाषा विभागांत प्रवेश मिळवण्यासाठी खेटे मारावे लागत होते. मात्र, गेल्या पाच वर्षांत परिस्थिती बदलली आहे.

काळानुरूप बदला न झाल्यामुळे हे विभाग इतरांच्या तुलनेत मागे पडत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना या विषयांकडे आकर्षित करण्यासाठी व्यवहार कोश तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

संपूर्ण माहितीचा तक्ता
नवे कुलगुरूडॉ. बी. ए. चोपडे यांनीही भाषा विभागांकडे लक्ष दिले आहे. त्यांच्या सूचनेवरून पाली आणि बुद्धिझम विभागाने पहिले पाऊल टाकले आहे. भाषेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा, सर्वसामान्य माणसांनाही पाली भाषा समजावी यासाठी विभागातर्फे मोनोग्रामसहित तक्ता तयार केला जाणार आहे. त्यात व्याकरण आणि पाली भाषा शिकण्यासाठी आवश्यक छोट्या छोट्या गोष्टींचा समावेश असेल. तक्ता पाहून लिपी समजण्यास मदत होईल, असे डॉ. आनंद यांनी सांगितले.
संशोधनासाठी प्रयत्न
येत्या सप्टेंबर महिन्यात यूजीसीकडून या प्रस्तावास मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. विद्यापीठातील सर्वात जुना हा विभाग असून अधिकाधिक संशोधन व्हावे यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे डॉ. आनंद म्हणाले. 60 विद्यार्थी क्षमता असणा-या या विभागात आज केवळ 25 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असून येणा-या काळात व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांच्या मदतीने विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख अभ्यासक्रमाची जोड देण्यासाठी पाठपुरावा विभाग करेल, असेही डॉ. आनंद यांनी सांगितले.

विद्यापीठातील भाषा विभागांमधील तोकडी विद्यार्थी संख्या चिंतेचा विषय ठरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या विभागांकडे आकर्षित करण्यासाठी हिंदी भाषा विभागात यावर्षीपासून दृक्श्राव्य माध्यमातून शिकवले जाणार आहे. तसेच पाली व बुद्धिझम विभागात लवकरच पाली भाषा व्यवहार कोश तयार केला जाणार असल्याने याचा फायदा विद्यार्थी संख्या वाढण्यासाठी होणार आहे. कुलगुरू बी. ए. चोपडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर संशोधनावर भर देऊन प्रत्येक विभागाच्या प्रमुखाची भेट घेत नवीन काय करता येईल, यासंबंधी विचारणा केली होती.