आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणचक्कीचे संपूर्ण सर्वेक्षण : समितीने व्यर्थ घालवले 42 दिवस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नहर-ए-अंबरीसह पाणचक्कीचे संपूर्ण सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्यासाठी दिलेल्या दोन महिन्यांच्या कालावधीपैकी 42 दिवस महापालिकेच्या सर्वेक्षण समितीने वाया घालवले आहेत. परिणामी नहर-ए-अंबरीचे अंतर्गत सर्वेक्षण 2013 मध्ये पूर्ण होण्याची शक्यता मावळली आहे. मात्र जेवढे सर्वेक्षण झाले त्यावर आधारित अहवाल खंडपीठात सादर करण्याचा समितीचा प्रयत्न आहे. तसे ेसंकेत समितीचे सदस्य प्रदीप देशपांडे यांनी दिले तर दोन्ही नहरींचे संपूर्ण सर्वेक्षण केल्याशिवाय अहवाल सादर करू नये, अशी भूमिका इतिहासतज्ज्ञ व सर्वेक्षण समितीचे सदस्य डॉ. शेख रमजान यांनी घेतली आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नहर-ए-पाणचक्कीच्या 90 मेनहोलचा अंतर्गत आणि बाह्य सव्र्हे करण्यात आला. दहा मेनहोल समितीला सापडले नाहीत. सर्वेक्षण समितीने 17 एप्रिल 2013 रोजी नहर-ए-अंबरीचे बाह्य सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली. या दिवशी 60 मेनहोलचे सर्वेक्षण पूर्ण झाले. 18 एप्रिलला या समितीला केवळ पंधराच मेनहोल सापडले. उर्वरित 25 मेनहोल सापडले नाहीत.

दोन दिवसांतील दहा तासांत सर्वेक्षणाचे काम करण्यात आले. 20 एप्रिल रोजी नहर-ए-पाणचक्कीच्या मेनहोलचे पाच तासांत बाह्य सर्वेक्षण आटोपले. त्या वेळी 34 मेनहोल आढळून आले नाहीत. गायब असलेले मेनहोल जमिनीच्या आत दडलेले असल्याचा इतिहासतज्ज्ञ डॉ. रमजान शेख यांचा दावा आहे. त्यानुसार सर्वेक्षण थांबवून प्राथमिक अहवाल तयार करण्यात आला. तो 24 एप्रिलला न्यायालयासमोर सादर केला.

अहवालावर न्यायालयाने समाधान व्यक्त केले. तथापि, दोन्ही अंतर्गत सर्वेक्षणासाठी समितीला दोन महिन्यांचा अतिरिक्त वेळ दिला. त्यानुसार 25 एप्रिलपासून अंतर्गत सर्वेक्षण सुरू होणे आवश्यक होते, परंतु 18 दिवसांनंतर म्हणजेच 13 मे रोजी नहर-ए- पाणचक्कीपासून सर्वेक्षणास प्रारंभ झाला. 13 मे ते 13 जून या एका महिन्याच्या कालावधीत समितीने 18 दिवसांत 90 मेनहोलचे सर्वेक्षण केले. या एक महिन्याच्या कालावधीत 12 दिवस सर्वेक्षण झाले नाही.

13 तारखेला काम थांबवल्यानंतर 25 जूनपर्यंतही सर्वेक्षणाचे काम करण्यात आले नाही. याचाच अर्थ एकूण 42 दिवस समितीचे सर्वेक्षणाचे काम झालेच नाही. नहर-ए-पाणचक्कीचा अंतर्गत सव्र्हेचा अंतिम अहवाल तयार करण्यात येत असून तो लवकरच न्यायालयासमोर सादर करण्यात येणार आहे, तर पावसाळा सुरू असून नहरीतून पाणी वाहत असल्याने नहर-ए-अंबरीचे सर्वेक्षण जानेवारीपर्यंत लांबणीवर पडणार असल्याचे कारण समितीचे सदस्य व पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, आर्किटेक्ट जयंत देशपांडे यांनी पुढे केले आहे.

मात्र जोपर्यंत दोन्ही नहरींचे पूर्ण सर्वेक्षण एकत्रित करून तो अहवाल न्यायालयापुढे सादर करणे योग्य ठरले असते, असे मत डॉ. रमजान यांनी व्यक्त केले.