आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक किलो पीठ, अर्धा किलो तेल, मिरची, अन् कांदा, निवडणुकीतील प्रचाराचा सोपा फंडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- ग्रामपंचायतीची निवडणूक लोकशाहीतील सर्वात अवघड अन् तेवढीच जोखमीची निवडणूक समजली जाते. येथे एका मताने चित्र बदलते. जिल्ह्यातील ५८७ ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी (४ ऑगस्ट) मतदान होत आहे. फुलंब्री तालुक्यातील काही गावांना भेटी दिल्या असता प्रचाराचे वेगवेगळे फंडे तसेच मतदारांना प्रलाेभने देण्याचे वेगवगळे प्रकार समोर आले.

प्रत्येक निवडणुकीत फक्त दारूचीच चर्चा होते. या वेळी एका गावात तर माणसांसाठी दारूची व्यवस्था करण्यात आल्यानंतर त्यांच्या घरच्यांचे काय असा प्रश्न उमेदवाराला पडला अन् त्याने त्यांचीही तेवढीच चोख व्यवस्था केली. प्लास्टिकच्या पिशवीत एक किलो चना पीठ, अर्धा किलो तेल, हिरव्या मिरच्या, अर्धा किलो कांदा घरपोच पोहोचवण्यात आला. घरचे तिकडे दारू पिताहेत तेव्हा तुम्ही भजे खा, अशा थेट शब्दात हे साहित्य वाटप करण्यात आले. सोमवार प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. रंगात आलेल्या या निवडणुकीच्या प्रचारात वेगवेगळे फंडे वापरण्यात आले. छोटीशी गावे, प्रत्येकाशी असलेले संबंध या गोंधळात गावोगाव प्रचार सुरू आहे. बहुतांश ठिकाणी थेट लढती आहेत. त्यामुळे उमेदवार दिवसातून प्रत्येक मतदाराला किमान दहा वेळा भेटतो. दिवसभरात 'रामराम-श्याम श्याम' झाल्यानंतर अंधारात खऱ्या प्रचाराला पुन्हा एकदा सुरुवात होते.

शनिवार अन् रविवार काही गावांना भेटी दिल्या असता रात्रीच्या वेळी येथे पुरुष मतदारांची मद्याची व्यवस्था सर्रास होत असल्याचे दिसले. दुसरीकडे महिला मतदारांची नाराजी दूर करण्यासाठी थेट त्यांच्यासाठी खास भज्यांची व्यवस्था करण्यात आली होती. मांसाहारी मतदारांसाठी 'पावकिलो मटण'ही घरपोच पोहाेचत होते. विशेष म्हणजे प्रतिस्पर्धी उमेदवारांना याची कल्पना होती. दुसऱ्यापेक्षा आपण जास्त देऊ अशी स्पर्धा त्यांच्यात लागली असल्याने अनेकांच्या घरी भज्यांचे साहित्य तसेच पावकिलो मटणही पोहाेचते होत होते. सोमवारी मांसाहार शक्य होणार नसल्याने रविवारी दोन सत्रांत पावकिलो मटण पोहाेचते करण्यात आल्याचे समजते.

अद्याप तक्रार नाही
दोन्ही-तिन्हीगटांकडून सारखेच फंडे वापरण्यात येत असल्याने अजून तरी मद्य किंवा अन्य काही साहित्याचे वाटप होते, अशी तक्रार समोर येऊ शकलेली नाही. कारण मंगळवारी मतदान झाल्यानंतर गावात पुन्हा पहिले पाढे पंचावन्न होईल अन् आसुरलेले मतदार पाच वर्षांची प्रतीक्षा करतील.