आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Panchayat Samiti Building Poor Construction Aurangabad

पंचायत समितीची ढासळती इमारत; ग्रामस्थ, कर्मचार्‍यांचा जीव धोक्यात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इमारत कधीही ढासळेल अशी परिस्थिती.नूतनीकरणासाठी सा. बां. खात्याने तांत्रिक मान्यता दिली.. जि. प. सीईओंनी ग्रामविकास व जलसंधारण विभागाला प्रस्ताव पाठवला.. निधीही मंजूर झाला, पण वर्ष होत आले तरी बांधकामाची एक वीटही चढलेली नाही. औरंगाबाद तालुक्यातील ग्रामपंचायतींवर नियंत्रण ठेवणार्‍या पंचायत समितीचे हे हाल आहेत, लालफीतशाहीच्या कारभारामुळे..परिणामी जुनाट व धोकादायक इमारतीत ग्रामस्थ, समितीचे कर्मचारी जीव मुठीत धरून काम करत आहेत.

तालुक्यातील 187 खेड्यांच्या 115 ग्रामपंचायतींच्या कारभारावर नियंत्रण ठेवणार्‍या औरंगाबाद पंचायत समितीची इमारत अखेरच्या घटका मोजत आहे. डीबी स्टारने या धोकादायक इमारतीचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून पाठपुरावा सुरूच ठेवला आहे. या इमारतीचे बांधकाम 1964 मध्ये करण्यात आले होते. लोडबेअरिंगमध्ये उभारलेली ही इमारत गेली पाच दशके ऊन, वारा, पाऊस झेलत उभी आहे. आता मात्र या इमारतीची दुरवस्था झाली आहे. ही इमारत कधी ढासळेल हे सांगता येत नाही. अस्तित्वात असलेले हे बांधकाम जमीनदोस्त करून त्या ठिकाणी नवीन इमारतीचे बांधकाम व्हावे व तेथे काम करणार्‍या कर्मचार्‍यांना असलेला धोका दूर व्हावा म्हणून चमूने 30 डिसेंबर 2011 रोजी ‘पंचायत समितीच्या इमारतीची पंचाईत’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून या प्रश्नाला वाचा फोडली होती.

3 कोटी 19 लाखांचा निधी
सीईओंनी पाठवलेल्या या प्रस्तावाला मान्यता देत 29 नोव्हेंबर 2012 रोजी ग्रामविकास व जलसंधारण विभागाने औरंगाबाद पंचायत समितीच्या नूतनीकरणासाठी 3 कोटी 19 लाख 31 हजार रुपयांचा निधी मंजूर केला.

सीईओंनी पाठवला प्रस्ताव
या तांत्रिक मान्यतेचा प्रस्ताव प्राप्त होताच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी 31 जुलै 2012 रोजी नवीन इमारत नूतनीकरणासाठी 4 कोटी 22 लाखांच्या अंदाजपत्रकाचा बांधकाम प्रस्ताव ग्रामविकास व जलसंधारण विभागाला पाठवला.

निधी आला पण..
निधी तर मंजूर झाला, मात्र प्रत्यक्षात या गोष्टीला वर्ष होत आले तरी काम सुरू झालेले नाही. या प्रकरणाचा चमूने पुन्हा तपास केला तेव्हा नूतनीकरणाच्या प्रस्तावाला प्रशासकीय ठरावासाठी सर्वसाधारण सभेच्या बैठकीची प्रतीक्षा असल्याचे उघड झाले.

काय म्हणतात जबाबदार
तातडीने टेंडर कॉलची प्रक्रिया राबवण्यासाठी विशेष जीबीची बैठक बोलावली जाईल. इमारतीचे काम तत्काळ मार्गी लावणार.-विजया पाटील चिकटगावकर उपाध्यक्षा, जि. प.

पुढील आठवड्यात ‘ ई’ टेंडर पद्धतीने निविदा काढल्या जातील. बजेट मोठे असल्याने सर्वसाधारण सभेची प्रशासकीय मान्यता आवश्यक आहे. ती मिळताच काम सुरू होईल.- भरतकुमार बावीस्कर,कार्यकारी अभियंता, जि. प.