आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Panchayat Samiti Election News In Marathi, Abdul Sattar, Divya Marathi

पंचायत समिती निवडणूक : सिल्लोडमध्ये मंत्री सत्तार यांना धक्का

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड - मंत्री अब्दुल सत्तार यांना धक्का देत सिल्लोड पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लताबाई वानखेडे, तर उपसभापतिपदी भाजपचे इद्रिस मुलतानी विजयी झाले. बहुमत असताना कॉँग्रेसला पराभवाचे तोंड पाहावे लागले. सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लताबाई वानखेडे यांनी राष्ट्रवादीच्याच माधवी कळात्रे यांचा, तर उपसभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपचे इद्रिस मुलतानी यांनी काँग्रेसचे विक्रांत दौड यांचा एका मताने पराभव केला. मावळते उपसभापती रमेश चिंचपुरे निवडणुकीस गैरहजर राहिले. सोळासदस्यीय सभागृहात भाजप सहा, काँग्रेस सहा व राष्ट्रवादी काँग्रेस चार असे बलाबल आहे. मावळत्या सभागृहाच्या काँग्रेसच्या सभापती रेखा जगताप व राष्ट्रवादीचे उपसभापती रमेश चिंचपुरे यांनी भाजपच्या उमेदवारांचा पराभव केला होता. याचा वचपा आज भाजपने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काढला. ठगन भागवत यांनी अब्दुल सत्तार यांचा युतीचा प्रस्ताव अमान्य केल्याने बदल होऊ शकला. प्रभाकर पालोदकर गटाच्या राष्ट्रवादीच्या माधवी कळात्रे मात्र कॉँग्रेससोबत राहिल्या.
भाजपला संधी
आगामी निवडणुकीच्या माध्यमातून अब्दुल सत्तार यांना धक्का देण्याचे भाजपचे प्रयत्न होते, तर भाजपची गरज ओळखून राष्ट्रवादी दोन्ही पदांसाठी अडून होती, तरीही भाजपने माघार न घेता उपसभापतिपद मिळवले.

कन्नडला मनसेचे मधे यांच्याकडे सभापतिपद
कन्नड | पंचायत समितीच्या सभापतिपदी मनसेचे खेमा मधे, तर उपसभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश गाढेकर यांची निवड करण्यात आली. कन्नड पंचायत समितीमध्ये एकूण १८ सदस्य असून राष्ट्रवादी ६, मनसे ५, शिवसेना ४, काँग्रेस २ व अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे. मतदानासाठी मनसेचे परसराम बोलकर, नामदेव राठोड, छाया जैस्वाल व सेनेचे सीताराम नागोडे आदी चार सदस्य गैरहजर होते. सभापतिपद एसटी प्रवर्गासाठी राखीव होते.

पैठणला पुष्पा केदारे यांची सभापतिपदी वर्णी
पैठण | पंचायत समितीच्या सभापतिपदी मनसेच्या पुष्पा केदारे, तर उपसभापतिपदी कृष्णा गिधाने यांची निवड झाली. सभापतिपद हे अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने त्या जागेसाठी मनसेच्या पुष्पा केदारे यांचा एकमेव अर्ज आला. त्यामुळे त्यांना सभापती म्हणून बिनविरोध घोषित करण्यात आले. उपसभापती पदासाठी मनसेचे कृष्णा गिधाने व शिवसेनेकडून ज्योती फासाटे यांचे अर्ज आले होते. त्यामुळे हात उंचावून मतदान प्रक्रिया पार पडली.

फुलंब्रीत पुन्हा माधुरी गाडेकरांकडे सभापतिपद राऊफ कुरेशी
फुलंब्री | येथील पंचायत समिती सभापतिपदी माधुरी गाडेकर, तर उपसभापतिपदी रऊफ कुरेशी यांची िनवड झाली आहे. पंचायत समिती ही आठ सदस्यांची असून माधुरी गाडेकर यांना सहा मते, तर िशवसेनेच्या सराेजा काळे यांना केवळ दाेन मते मिळाली, तर रऊफ कुरेशी यांची उपसभापती िबनविराेध िनवड झाली आहे. आठ सदस्यांत काॅँग्रेस तीन, राष्ट्रवादी काॅँग्रेस तीन व िशवसेना दाेन असे संख्याबळ आहे. यापूर्वीही गाडेकर या सभापती झाल्या होत्या.

गंगापूर पंचायत समितीवर सेनेची सत्ता
गंगापूर | पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने सत्ता राखण्यात यश मिळवले असून सेनेचे संजय जैस्वाल यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी आमदार प्रशांत बंब गटाचे कृष्णा सुकासे यांचा १० विरुद्ध ७ मतांनी पराभव करून विजय संपादन केला. उपसभापतिपदी वर्षा गंडे या विजयी झाल्या. समितीमध्ये सेनेचे १० सदस्य आहेत. काँग्रेस ३, आमदार प्रशांत बंब गटाचे ३ , मनसे १ व राष्ट्रवादीचा १ अशी सदस्य संख्या आहे.

खुलताबाद समितीवर कॉँग्रेसचे वर्चस्व कायम
खुलताबाद | पंचायत समितीवर काँग्रेसने पुन्हा ताबा मिळवला असून सभापतिपदी काँग्रेसच्या फरजाना पटेल तर उपसभापतिपदी बंब गटाचे दिनेश अंभाेरे यांची वर्णी लागली आहे. रविवारी पंचायत समितीत पीठासन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी स्वाती कारले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यात सभापती पदासाठी फरजाना पटेल, तर शिवसेनेच्या वतीने कुसुमबाई मिसाळ यांनी अर्ज दाखल केले होते.

वैजापुरात द्वारका पवार सभापतिपदी उपसभापतिपदी सुभाष जाधव
वैजापूर | पंचायत समितीच्या सभापतिपदी ओबीसी प्रवर्गातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या द्वारका पवार, तर उपसभापतिपदी सुभाष जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
विनायकराव सभागृहात सभापती व उपसभापती निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी पीठासन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नारायण उबाळे होते. या बैठकीत सभापती पदासाठी द्वारका पवार व उपसभापती पदासाठी सुभाष जाधव यांचाच एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्या दोघांची सभापती व उपसभापतिपदी निवड झाल्याचे उबाळे यांनी जाहीर केले. त्यांना गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, कक्ष अधिकारी संजय दारवंटे, कार्यालयीन अधीक्षक जी. पी. राऊतवार, वरिष्ठ लिपिक सय्यद अली यांनी साहाय्य केले. नवनिर्वाचित सभापती पवार व उपसभापतिपदी जाधव यांच्या बिनविरोध निवडीबद्दल माजी आ. कैलास पाटील चिकटगावकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष भाऊसाहेब पाटील चिकटगावकर,जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा विजया निकम,माजी सभापती चंद्रकला शेळके, लहानुबाई डिके, बिजला साळुंके,वमिल पवार आदींनी सत्कार केला. या वेळी जि. प. सदस्य दिनकर पवार, सूरज पवार, अॅड. प्रताप निंबाळकर, शिवाजी आधुडे, वाल्मीक बोढरे, द्रौपदाबाई तेझाड, सारंगधर डिके, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस एल.एम.पवार, अरुण शर्मा, साई मतसागर, रामचंद्र शेळके, राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब भोसले, प्रभाकर बारसे, उपनगराध्यक्ष संदीप टेके, मजीद कुरेशी, गोविंद धुमाळ, धीरज राजपूत, प्रेम राजपूत, अल्ताफ शेख, नंदू लाडवाणी, नाना इंगळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काँग्रेसच्या नंदा आगे, चंद्रकांत पाटलांची िनवड
सोयगाव । येथील पंचायत समितीच्या सभापतिपदी काँग्रेसच्या नंदाबाई आगे, तर उपसभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत पाटील यांची बिनविरोध निवड झाली. आगे या दुसऱ्यांदा सभापतिपदी विराजमान झाल्या आहेत. सोयगाव पंचायत समितीत काँग्रेसचे तीन, राष्ट्रवादी काँग्रेसचा १, शिवसेना-भाजप प्रत्येकी १ असे बलाबल आहे. मागील वेळी सभापतिपद ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी राखीव होते. हात उंचावून या िठकाणी मतदान प्रक्रिया पार पडली.