आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जुने काम करत नसतील तर नव्यांना संधी देणार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जुनी मंडळी काम करत नसतील तर पुढील वर्षी होणाऱ्या नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांत नव्यांना संधी देऊ, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी बुधवारी (१७ ऑगस्ट) सांगितले. इतर पक्षात चांगले काम करणारा कोणी भाजपमध्ये येत असेल तर त्याला बंदी घालू नका. फक्त त्याचे गुन्हेगारी रेकॉर्ड नाही, याची खात्री करून त्याला प्रवेश द्या, असेही ते म्हणाले. भाजपच्या दीनदयाल उपाध्याय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
हिवाळे लॉन्सवर आयोजित या तीनदिवसीय प्रशिक्षण शिबिरात पावणेतीनशे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. या वेळी भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी, केशव उपाध्ये, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, आमदार अतुल सावे, सतीश पत्की, डॉ. भागवत कराड, किशनचंद तनवाणी उपस्थित होते.

पराभवाची दखल देशपातळीवर :दानवे म्हणाले, केंद्रात आणि राज्यातही आपले सरकार अाहे. आपल्या पराभवाकडे देशाचे लक्ष आहे. यापूर्वी जिंकल्यावरही दखल घेतली जात नव्हती. आता एखाद्या पोटनिवडणुकीतही पराभव झाला तरी त्याची दखल देशपातळीवर घेतली जात आहे. त्यामुळे पराभूत होणारा उमेदवार द्यायचाच नाही.

...तर २५ वर्षे कोणीही हलवणार नाही : भाजपकडेफारशा जिल्हा परिषदा नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदा जिंकणे आपले ध्येय आहे. तेथे सत्ता आली तर २५ वर्षे आपल्याला कोणीही हलवणार नाही, असेही दानवे म्हणाले.

विदर्भाच्या मुद्द्यावर कोलांटउडी : दोनआठवड्यांपूर्वी विदर्भ राज्य होणार असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले होते. मात्र, बुधवारी त्यांनी कोलांटउडी घेतली. मी मराठवाड्याचा राहणारा आहे, विदर्भाचे समर्थन करणारा नाही. वेगळ्या विदर्भाबाबत मी माझी भूमिका मांडलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलेले आहे. भाजपचे छोट्या राज्यांना समर्थन आहे. आमच्यापुढे विदर्भ राज्याचे नव्हे तर विकासाचे मोठे प्रश्न आहेत, असेही ते म्हणाले. शिबिराच्या समारोपानंतर पत्रकारांशी बोलताना दानवे म्हणाले की, भाजपने झारखंड, उत्तराखंड स्वतंत्र राज्ये केली. तिथे लोकांनी एकमेकांना पेढे खाऊ घातले. काँग्रेसने राजकारण करत आंध्रचे विभाजन करताना तेलंगणातल्या लोकांना गोळ्या खाऊ घातल्या.
निवडणुकांसंदर्भात ते म्हणाले की, भाजपच्या संघटनात्मक दृष्टीने राज्यात ६५ जिल्हे आहेत. त्यातील ६० जिल्ह्यांत प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. शिवसेनेसोबत युती करण्याकडे आमचा कल आहे. मात्र, स्थानिक पातळीवरच निर्णय होईल. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी दोन रुपये किलोने गहू, तांदूळ असेल अथवा विकासाच्या इतर योजनांचा लाभही मराठवाड्याला मिळत आहे. त्यामुळे राज्य सरकारचा मराठवाड्यावर कोणताही अन्याय नाही, असा दावा दानवेंनी केला. मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक पुढच्या काळात नक्की होईल, असेही ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...