आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Panchayat Samiti Junior Engineer R. S. Kirtane Suspended

टाळूवरचे लोणी महागात, अभियंत्याला घरचा रस्ता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद- कसाबखेडा येथील स्मशानभूमीच्या बांधकामात अपहाराचा आरोप असलेले खुलताबाद पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता आर. एस. किरतने यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित चौधरी यांनी दोषी धरत निलंबित केले आहे. किरतने यांना स्मशानभूमीच्या बांधकामाचा अपहार चांगलाच महागात पडला असून विविध विभागांतील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे या कारवाईने धाबे दणाणले आहेत.
राजेराय टाकळी येथील रोजगार हमी योजनेतील कामातील भ्रष्टाचाराचे प्रकरण ताजे असतानाच कसाबखेडा येथील स्मशानभूमीच्या कामातील अपहाराचे प्रकरण समोर आले. हे प्रकरण पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता किरतने यांच्या अंगलट आले असून मुख्य कार्यकारी अधिकारी चौधरी यांनी निलंबित केले असल्याचे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बी. एस. बावीस्कर यांनी सांगितले. ग्रामविकास जनसुविधा कार्यक्रमातून कसाबखेड्यात २०१२-१३ मध्ये स्मशानभूमीच्या सुशोभीकरण करण्याकरिता पाच लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. कामाची जबाबदारी तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता आर. एस. किरतनेंकडे सोपवली होती. किरतने, ग्रामसेवक बी. एल. मोरसकर, सरपंच रूपाली सोनवणे व ठेकेदार यांनी संगनमत करून कामात अपहार केल्याचा आरोप पांडुरंग पाटील यांनी केला होता.
ग्रामसेवकांचीही चौकशी होणार
त्या कामाच्या चौकशीचे आदेश मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी खुलताबादच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता मंजूद अहेमद यांना दिले होते. अहेमद यांनी चौकशी अहवाल तयार करून जिल्हा परिषदेकडे सादर केला होता. अहवालानुसार किरतने यांनी कामात अपहार केल्याचे स्पष्ट झाले. ग्रामसेवक बी. एल. मोरसकर यांचीही विभागीय चौकशी होणार आहे.
शाखा अभियंत्यावर कारवाई करा
राजेराय टाकळी येथे रोहयोच्या कामाच्या अपहाराबाबत मनोज कुचे यांनी अनेकदा विविध विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. कोणत्याही विभागाने दखल न घेतल्याने कुचे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने संबंधित दहा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर चौकशी करून गुन्हे नोंदवण्याचे खुलताबाद पोलिसांना आदेशित केले होते. सध्या त्या कामाची चौकशी पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे करत आहेत. दहापैकी जिल्हा परिषद सिंचन उपविभाग कन्नड शाखा अभियंता आर. एम. अमृतकर यांनी पुन्हा राजेराय टाकळीसह वेरूळ येळगंगेतील सिमेंट बंधाऱ्याच्या कामात अपहार केला असल्याचे समोर आले आहे. दहा लाख रुपये खर्च करून बांधलेला बंधारा तळापासून वाहून गेला आहे. त्यामुळे या शाखा अभियंत्यावरही कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी वेरूळवासींयाकडून होत आहे.