आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आनंद देतो, आनंद घेतो; पॅडीचा विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदगाव - शहरातील माणसे असो किंवा ग्रामीण भागातील, हल्ली सगळेच जण कोणत्या ना कोणत्या तणावाखाली जगत आहेत. अशा या तणावपूर्ण जगण्यातून त्यांना क्षणिक आनंद देण्याचे काम आम्ही कलाकार करतो. त्यासाठी दूरचित्रवाणीच्या मालिका हे उत्तम माध्यम आहे. याद्वारे आम्ही आनंद देतो आणि त्याबदल्यात आनंद घेतो, असे मत पॅडी ऊर्फ पंढरीनाथ कांबळे याने व्यक्त केले.
मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वार्षिक गुणगौरव सोहळ्यात पॅडी बोलत होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक दिलीप पाटील होते.
राहुरी कृषी विद्यापीठाचे प्राचार्य जितेंद्र मेटकर यांनी घेतलेल्या मुलखतीत पॅडीने मनमोकळ्या गप्पा मारल्या. अभिनयासाठी परिसरातील विविध व्यक्तींचे आणि घटकांचे निरीक्षण करावे लागते. भेटलेला प्रत्येक माणूस कसे वागतो, कसे बोलतो, त्याच्या लगबी काय, याचा अभ्यास करून अभिनयाची संधी मिळाल्यावर व्यक्तिचित्र उभे करण्याचा प्रयत्न केला जातो. लहानपणी इंजिनिअर व्हावे, असे वाटत होते. मात्र, हळूहळू गायन आणि नाटकाची आवड निर्माण झाल्याने अभिनयाकडे कसे वळलो हे कळलेही नाही. तुमच्यात अभिनय कला आहे आणि ती सादर करण्याची तुमच्यात धमक आहे, असे जर तुम्हाला वाटत असेल तर कोणत्याही गॉडफादरची गरज नसल्याचे त्याने ठामपणे सांगितले. अभिनय करताना घडलेल्या विविध गमतीजमती कशा घडतात हेदेखील त्याने विद्यार्थ्यांना छोट्याशा अभिनयातून दाखवले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.