आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हजारो नागरिकांच्या साथीने रामनगरात साफसफाई; नवनियुक्त मंत्र्यांना पाहण्यासाठी उसळली गर्दी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - रस्त्यावरून जाताना कोणीही तंबाखू खाऊन थुंकत असेल तर गांधीगिरीचा मार्ग अवलंबा. रस्ता घाण करणाऱ्याला जाब विचारा, असा सल्ला ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिला. रविवारी मुकुंदवाडी-रामनगर परिसरात पंकजा यांच्या हस्ते स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली त्या वेळी त्या बोलत होत्या. तत्पूर्वी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. अभियानात हजारो लोकांनी सहभाग नोंदवला.
भाजपचे शहराध्यक्ष बापू घडामोडे यांच्या घरासमोरून पंकजा यांनी स्वच्छता अभियानाला प्रारंभ केला. या वेळी झालेल्या कार्यक्रमात घडामोडे, डॉ. भागवत कराड, शिरीष बोराळकर अनिल मकरिये यांची उपस्थिती होती. स्वत: पंकजा यांनी झाडू हातात घेऊन साफसफाई केली.
फोटोपुरती स्वच्छता नको
या वेळी भाजपच्या वतीने पंकजा यांचा सत्कार करण्यात आला. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना त्या म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छतेचे अभियान देशाला दिले आहे. आपल्या घरात आपण झाडूची पूजा करतो. त्यामुळे जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी असते. त्यामुळे सर्वांनी स्वच्छतेसाठी पुढाकार घ्या. महात्मा गांधी यांच्या नावाचा उपयोग सर्वांनीच करून घेतला. मात्र, त्यांनी दिलेल्या स्वच्छतेच्या संदेशाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सर्वांनी स्वच्छता केली पाहिजे. केवळ फोटो काढण्यापुरती स्वच्छता करू नका. मी गेल्यानंतर हा परिसर स्वच्छ करा, असे आवाहनही त्यांनी केले.
सरकार कंत्राटदारांचे नाही
पंकजा म्हणाल्या, हे सरकार कंत्राटदारांचे नाही. त्यामुळे शेवटच्या स्तरापर्यंतच्या लोकांना फायदा झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मंगळसूत्र विकून शौचालय बांधणाऱ्या महिलेचा आम्ही सत्कार केला. कारण माझी आई म्हणाली की, कुठल्याही महिलेसाठी तिचे मंगळसूत्र मौलाचे असते. यापुढेही ग्रामीण भागात स्वच्छतागृह बांधण्यावर आपला भर राहील, असे त्या म्हणाल्या.

व्यासपीठ कोसळेल हो...
भाजप कार्यकर्त्यांची बेशस्त आजही दिसून आली. कार्यक्रम सुरू असताना पंकजा यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर एकच गर्दी केली होती. सूत्रसंचालन करणारे बापू घडामोडे कार्यकर्त्यांना "स्टेजचा प्रॉब्लेम आहे, खाली उतरा, व्यासपीठ कोसळेल,’ असे वारंवार सांगत होते. पण त्यांच्याकडे कानाडोळा करत कार्यकर्त्यांनी व्यासपीठाचा ताबा घेतला. पंकजांसोबत फोटो काढण्यासाठी कार्यकर्त्यांची चढाओढ लागली होती. रस्त्यावर साफसफाई करतानाही कार्यकर्ते ढकलाढकली करत होते. दरम्यान, एकमेकांना ढकलण्याचे प्रकारही घडले. असाच प्रकार शनिवारी विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताच्या वेळी घडला होता.