आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिस्टीम बदलेन अथवा बाहेर पडेन, घाणेरडे राजकारण करणार नाही : पंकजा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महिला व बालकल्याण खात्याशी संबंधित ठेकेदारांची मोठी लाॅबी आहे. ती तोडण्याचा प्रयत्न केला म्हणून मला बदनाम करण्याचे प्रयत्न झाले. पण त्यामुळे मी खचून गेलेली नाही. आता हा विषय मी धसास लावणार आहे. मी सिस्टिम बदलण्यासाठी राजकारणात आले आहे आणि ती मी बदलणार आहे. जर सिस्टिम बदलता आली नाही तर मी येथून बाहेर पडेन; पण असे घाणेरडे राजकारण करणार नाही, अशा शब्दांत मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पंकजा या शनिवारी औरंगाबादेत होत्या. दुपारी त्यांनी ‘दिव्य मराठी’ कार्यालयाला भेट दिली. या वेळी संपादकीय सहकाऱ्यांशी त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. या वेळी त्या काय म्हणाल्या हे त्यांच्याच शब्दांत...
मी माझे काम चांगल्या भावनेतून करते आहे. त्याला राजकारण म्हणायचे का, हेही मला अजून कळत नाही. पण माझ्या कामामुळे ज्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला ते अस्वस्थ झाले आहेत. मला राजकारणातून संपवण्याचाच त्यांचा प्रयत्न आहे. मी, माझे पती आणि मुलगा आम्ही विदेशात असताना आरोप करण्यात आले. मला जेव्हा पहिल्यांदा ते कळले त्या वेळी माझ्यामुळे माझ्या वडिलांचे नाव तर बदनाम होत नाही ना, असा विचार क्षणभर मनात आला; पण मी काहीही चुकीचे केलेले नसल्यामुळे घाबरण्याचा प्रश्नच नव्हता. अशा परिस्थितीत माझ्या वडिलांनी काय केले असते, असा मी विचार केला आणि वस्तुस्थिती जनतेसमोर येऊन स्पष्ट केली. माध्यमांसमोर जाऊ नका, असा सल्ला अनेकांनी मला िदला; पण सत्य सांगितलेच पाहिजे हे मी ठरवले होते आणि तसे मी केले. मी आश्रमशाळांतील भ्रष्टाचार खणून काढण्याचा प्रयत्न केला. अनेक ठिकाणी छापे टाकले. बायोमेट्रिक हजेरीची व्यवस्था केली. ठेकेदारांची लाॅबी तोडली. त्या सगळ्याचा काय परिणाम झाला, हे तुम्ही सगळे पाहता आहात; पण मी हा विषय सोडून देणार नाही. धसास लावणार आहे. अनेक वर्षांपासून चालत आलेली व्यवस्थाच बदलवावी लागणार आहे. ती मला बदलता नाही आली तर मी स्वत: बाहेर पडेन; पण असे घाणेरडे राजकारण करणार नाही. माझ्यावर असले संस्कार नाहीत. सुदैवाने मला काहीही कमी नाही आणि लहान मुलांच्या तोंडचा घास पळवण्याइतकी तर मी असंस्कारी मुळीच नाही.

काही विषय मुद्दाम उपस्थित केले जातात. माझ्या पतीने चालवलेल्या फॅक्टरीत सर्व नियम पाळले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून ही फॅक्टरी सुरू आहे. विरोधी पक्षाचे सरकार असतानाही सुरू होती. पण मी आमदार झाले त्या वेळीही आतासारखाच त्या फॅक्टरीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला जे आता होते आहे. विरोधी पक्ष सत्तेत असताना कधी फॅक्टरी बंद झाली नाही. आता का असे होऊ देता, असे मला अनेकांनी सांगितले; पण मी सरकारी कामात हस्तक्षेप करून काहीही करणार नाही. कोणाला आमचा ब्रेड-बटरही सहन होत नसेल तर काय म्हणायचे? माझ्या पतीने माझ्या मंत्रालयासमोर टेबल टाकून बसावे अशी त्यांची अपेक्षा आहे का?

अाजच्या कार्यक्रमात एकाने मला चिठ्ठी पाठवली. त्यात लिहिले होते : ताई तुम्ही मुख्यमंत्री व्हा. मी म्हटलं, मला अजिबात मुख्यमंत्री व्हायचे नाही. जे काम आहे तेच मला नीट करू द्या. तेवढीच माझी इच्छा आहे. ग्रामीण विकास हे माझे पॅशन आहे. आमदार म्हणून वैद्यनाथ कारखान्याच्या सहकार्याने मी जलसंधारणाची कामे केली आहेत. त्याचा परिणाम पाहिला आहे. त्यामुळे मंत्री म्हणून त्याच कामाला मी जलयुक्त शिवार योजनेचे स्वरूप दिले. अवघ्या २४ तासांत तो निर्णय झाला. झटपट निर्णय घेण्याचा माझा स्वभाव आहे. तसेच मी करीत राहणार आहे. मी मराठवाड्याचे नेतृत्व करावे, असेही म्हटले जाते आणि त्याबाबत विचारले जाते. मी करणार आहे मराठवाड्याचे नेतृत्व. कारण इथल्या जनतेने आमच्यावर प्रेम केले आहे. त्यामुळे तो माझा हक्क आहे आणि कर्तव्यही आहे.
मी "मधुरिमा'ची सदस्य
या वेळी मधुरिमा क्लबचे सन्माननीय सदस्यत्व पंकजा मुंडे यांना देण्यात आले. सदस्यत्वाचे कार्ड दाखवून त्यांनी उपस्थित सर्वांना मी मधुरिमाची सदस्य झाले, असे सांगितले. मला मधुरिमा पुरवणीत लेख लिहायला आवडेल, असेही त्या म्हणाल्या. एका कार्यक्रमाचे आमंत्रण त्यांना मधुरिमा क्लबच्या प्रमुख वृषाली घाटणेकर यांनी दिले. त्या वेळी अधिवेशन सुरू नसेल तर नक्की येईन, असेही त्यांनी आश्वासन दिले.
बातम्या आणखी आहेत...