आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंकजा मुंडे यांना घडवली तनवाणींनी गुलमंडीची सैर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- खरेदी करायची नसली तरी गुलमंडीवर फिरण्याचा मोह अनेकांना सुटत नाही. महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनीही शनिवारी गुलमंडीवर फेरफटका मारला. निमित्त होते माजी आमदार किशनचंद तनवाणी मित्रमंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मोफत वापराच्या पाण्याचा शुभारंभ योजनेचे. यासाठी पंकजा यांनी तनवाणी यांच्या कार्यालयापासून म्हणजेच जेथलिया टॉवर ते गुजराती शाळेपर्यंत त्या पायी चालल्या. तनवाणी यांनी आग्रह केल्याने पंकजा यांची गुलमंडीची सैर होऊ शकली. त्यामुळे पोलिस तसेच अन्य नेत्यांची मात्र दमछाक झाली.
पिण्याच्या शुद्ध पाण्याच्या प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर पंकजा यांना कार्यक्रमस्थळी जायचे होते. अरुंद रस्त्यांमुळे मोटारींचा ताफा जाण्यास विलंब होईल, त्यापेक्षा आपण पायीच जाऊ, शिवाय आज शनिवार आहे, सुपारी हनुमानाचे दर्शन घेऊ, असे तनवाणी यांनी सांगितल्यानंतर अख्खा ताफा पायी निघाला. गुलमंडीच्या अरुंद रस्त्यावरूंन पंकजा मुंडे पायी जात असल्याचे दिसल्याने दुतर्फा गर्दी झाली होती. कार्यक्रमस्थळी पोहोचले तेव्हा पंकजा यांच्यासह त्यांच्यासोबतचे कार्यकर्ते घामाघूम झाले होते. पंकजा म्हणाल्या, येथे एस. बी. कॉलेजला असताना गुलमंडीवर मी नियमित येत असे. तेव्हाही अन् आताही वाहतूक कोंडी तशीच आहे.
पहिल्या टप्प्यात अडीचशे घरांना वापरायचे पाणी रोज एक तास नळाने देण्याच्या योजनेचा शुभारंभ पंकजा यांनी केला. या वेळी आमदार अतुल सावे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, विभागीय संघटक प्रवीण घुगे, शहराध्यक्ष भगवान घडामोडे, उपमहापौर प्रमोद राठोड, स्थायी समितीचे सभापती दिलीप थोरात, नगरसेवक राजू तनवाणी, बंटी तनवाणी, माजी नगरसेवक अनिल मकरिये आदी उपस्थित होते.
स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मदिनी म्हणजेच १२ डिसेंबरपर्यंत गुलमंडी, राजाबाजार, खाराकुवा या परिसरातील प्रत्येक घराला मोफत वापराचे पाणी देण्याचा शुभारंभ करणार असल्याचे तनवाणी यांनी सांगितले. त्याचबरोबर पूर्ण शहरात असा प्रयोग करण्यासाठी मंत्री म्हणून पंकजा यांनीही प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
माझ्यावरील आरोप या तर चोरांच्या उलट्या बोंबा
त्यांच्यावर झालेल्या घोटाळ्याचा उल्लेख करता पंकजा म्हणाल्या, राजकारणाचा स्तर खालावला आहे. दुसऱ्याची प्रतिमा मलिन करण्यासाठी अराजक पद्धतीने टीका केली जाते. दुसऱ्याला बदनाम करण्यासाठी नवीन घाणेरडी पद्धत आता राजकारणात आली आहे. खोटे स्कॅम असल्याचे दाखवले जाते. या तर चोरांच्या उलट्या बोंबा आहेत. ज्यांनी भानगडी केल्या तेच आरोप करताहेत. परंतु खोट्या बोंबा जास्त वेळ मारता येत नाहीत. जनतेला सर्व कळते. म्होरक्या होण्याची ताकद कोणात आहे हेही जनतेला समजते, असेही त्या म्हणाल्या.
तनवाणींचे केले तोंडभरून कौतुक
यावेळी बोलताना पंकजा यांनी माजी आमदार तनवाणी यांचे तोंडभरून कौतुक केले. राजकारणात चांगले लोक नाहीत, अशी टीका होते. मात्र आपण समाजाचे काही देणे लागतो, या भावनेने काम करणारे राजकारणी आहेत. भावी पिढीसाठी हे काम चांगला संदेश देणारे असल्याचे त्या म्हणाल्या.
बातम्या आणखी आहेत...