आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गायरान जमीन कास्तकऱ्यांच्या नावे करा, पँथर रिपब्लिकनची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद - तालुक्यातील विविध समस्या सोडवण्याच्या मागणीसह जिल्ह्यात गायरान जमीन वर्षानुवर्षे कसणाऱ्या कास्तकऱ्यांच्या नावे ती तत्काळ करून त्यांना जमिनीचा सातबारा देण्यात यावा, या मागणीसाठी पँथर रिपब्लिकन पार्टीच्या वतीने खुलताबादच्या तहसील कार्यालयावर विविध घोषणा देत सोमवारी धडक मोर्चा काढण्यात आला. यात तालुकाभरातील शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या मोर्चाची सुरुवात खुलताबाद शहरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर मोर्चा बसस्थानक मार्गे, पंचायत समिती येथून मोठी आळी मार्गे तहसील कार्यालयावर गेला. त्यानंतर तहसीलदार बालाजी शेवाळे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यात वर्षानुवर्षे गायरान जमीन कसून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबाच्या नावे करून त्यांना त्या जमिनीचा सातबारा देण्याची कार्यवाही शासनाने तत्काळ करावी. संजय गांधी योजनेच्या लाभार्थींना तत्काळ थकलेले मानधन देण्यात यावे. गल्लेबोरगाव येथील बौद्ध व मातंग स्मशानभूमीचे मोजमाप करण्यात यावे. पळसगाव शेतवस्तीवर बंद केलेला रस्ता पूर्ववत करण्यात यावा. तसेच तालुक्यात दलितवस्त्यामध्ये झालेल्या रस्त्याच्या कामाचीही चौकशी करण्यात यावी, अशा विविध मागण्या नमूद करण्यात आल्या आहेत. या निवेदनावर पँथर रिपब्लिकन पार्टीचे मराठवाडा अध्यक्ष पंडित नवगिरे, जिल्हाध्यक्ष किशोर जाधव, उपाध्यक्ष पंकज बोरडे, अनिल सदाशिवे, तालुकाध्यक्ष सुनील घुसळेसह आदी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...