आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Panthers Republican Party Action Against Municipal

गाडेंच्या कार्यकर्त्यांचा महापालिकेत गोंधळ, आयुक्त केंद्रेकरांच्या दालनासमोर आरडाओरड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सामाजिक न्याय भवनासमोरील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे नेते गंगाधर गाडे यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी आज मनपात गोंधळ घातला. या कार्यकर्त्यांना प्रवेशद्वारावर रोखल्यावर तेथे कार्यकर्त्यांनी ढकलाढकली करत गेटवर लाथा- बुक्क्या मारल्या, तर आत मनपा आयुक्तांच्या दालनाबाहेर आरडाओरड करून इमारत डोक्यावर घेतली.

खोकडपुऱ्यातील सामाजिक न्याय भवनासमोर होत असलेले अतिक्रमण काढण्याचा विषय गेल्या काही दिवसांपासून तापत आहे. आज संविधान रॅली काढल्यानंतर पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे नेते गंगाधर गाडे आपल्या कार्यकर्त्यांसह मनपात पोहोचले. सुरक्षा रक्षकांनी एवढा मोठा जमाव पाहून प्रवेशद्वार बंद करून घेतले मोजक्याच लोकांना आत जाता येईल, असे सांगितले. पण गाडे यांच्यासोबत सगळ्यांनाच जायचे असल्याने कार्यकर्त्यांनी आरडाओरड करायला सुरुवात केली.
काहींनी तर थेट प्रवेशद्वारावरच लाथा- बुक्क्या घातल्या. यानंतरही काही कार्यकर्ते आत घुसलेच. गंगाधर गाडे यांच्यासोबत आयुक्तांच्या दालनात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना पुन्हा रोखण्यात आले. या वेळी या कार्यकर्त्यांनी पुन्हा जोरदार आरडाओरड करत इमारत डोक्यावर घेतली. या गोंधळामुळे संतापलेले आयुक्त केंद्रेकर बाहेर आले त्यांनी गोंधळ घालणाऱ्यांवर गुन्हे दाखल करू, असा इशारा दिल्यावर सारे शांत झाले. दरम्यान, या प्रकाराची माहिती कळताच पोलिस ताफा लगेच मनपाच्या परिसरात दाखल झाला. सायंकाळी सहायक पोलिस आयुक्त खुशालचंद बाहेती यांनी आयुक्त केंद्रेकर यांचीही भेट घेतली झाला प्रकार जाणून घेतला.