आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंबातील पाणी संपले, कर्मचारी नुसते पाहात राहिले; पेपर मिलला लागलेल्या आगीत 2.5 कोटींचे नुकसान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आडूळ (औरंगाबाद) - शॉटसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत पेपर मिलमधील  सव्वादोन कोटी रुपये किमतीचे पुठ्ठे जळून खाक झाल्याची घटना कचनेर फाटा येथील उमेश पेपर मिल येथे गुरुवारी (२७ एप्रिल) पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे तीन बंब बोलावण्यात आले होते. दरम्यान,  बंबामधील पाणी संपल्याने कर्मचाऱ्यांनी याबाबत वरिष्ठांना सूचना देऊन आणखी बंब पाठवण्याचे सुचवले. परंतु आणखी बंब पाठवले नसल्याने अग्निशमन दलाच्या १२ कर्मचाऱ्यांना बघ्याची भूमिका घ्यावी लागली.
 
सत्यनारायण अग्रवाल यांच्या मालकीची औरंगाबाद-बीड मार्गावरील कचनेर फाट्यावर उमेश पेपर मिल आहे. या मिलच्या कंपाउंडमध्ये त्यांचा कोट्यवधी रुपये किमतीचा पुठ्ठा होता. या पुठ्याला गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास शार्टसर्किटमुळे आग लागली. काही कळायच्या आतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने या आगीत येथे साठवून ठेवलेले पुठ्ठे जळून खाक झाले. यात अंदाजे सव्वादोन ते अडीच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सत्यनारायण अग्रवाल यांनी सांगितले. ही आग विझविण्यासाठी महापालिका, समर्थ कारखाना आणि शेंद्रा एमआयडीसी अशा तीन अग्निशमक दलाच्या बंबांना पाचारण केले होते. सकाळी सहा वाजता बंब आल्यानंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझविण्यास सुरुवात केली. दरम्यान, बंबांतील पाणी संपल्यानंतर परिसरातील चार-पाच ट्रॅकरने पाणी आणून बंबात टाकण्यात आले. दुपारी जवळापास एक वाजेपर्यंत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. 
 
दरम्यान, पाणी संपल्याने घटनास्थळावरील अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी शेंद्रा व औरंगाबाद महापालिकेचे आणखी बंब पाठवावेत, अशी सूचना केल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. परंतु कर्मचाऱ्यांनी सांगूनही आणखी बंब पाठवण्यात आले नसल्याने मोठ्या प्रमाणात आग धुमसत होती. बंब पाठवले नसल्यामुळे घटनास्थळावरील अग्निशमन दलाचे १२ कर्मचारी दुपारी एक ते पाच वाजेपर्यंत बसून होते. शेवटी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अग्रवाल यांनी परिसरातील सात टँकर लावून परिसरातील शेततळ्यातील पाणी बंबामध्ये आणून टाकण्यास सुरुवात केली. तसेच पुठ्ठे बाजूला मशिनरीद्वारे सारण्यात येत असताना आणखीनच पुठ्ठे शिलगून आगीचे लोळ उठत होते. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरूच होते.
 
बंब पाठवता आले नाही
अग्निशमन विभागाकडून मागणी होताच चिकलठाणा विभागाच्या दोन व शेंद्रा एमआयडीसी विभागाचा एक बंब पाठवण्यात आला होता. उर्वरित दोन बंब शहरात ठेवणे बंधनकारक असल्याने ते पाठवू शकत नाही. त्यामुळे तीनपेक्षा अधिक बंब पाठवता आले नाही, असा खुलासा अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केला.
बातम्या आणखी आहेत...