आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुक्त केंद्रेकरांनी सुरू केले समांतर योजनेचे "पोस्टमाॅर्टेम'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गेल्या आठवड्यात समांतरसंदर्भात बैठक घेतल्यानंतर मनपा आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आता या योजनेचे पोस्टमाॅर्टेम सुरू केले आहे. योजनेच्या तांत्रिक आर्थिक माॅडेलची त्यांनी आपल्या पातळीवर तपासणी सुरू केली असून करारातील बारीकसारीक बाबींवर त्यांनी मनपाचे अधिकारी समांतरचे अधिकारी यांच्याकडे स्पष्टीकरणे मागितली आहेत. आगामी महिनाभरात या योजनेबाबत केंद्रेकर कोणत्या निष्कर्षावर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

गेल्या आठवड्यात केंद्रेकर यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारताच समांतरवर लक्ष केंद्रित करीत पहिली बैठक बोलावली होती. या योजनेबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांची माहिती त्यांनी घेतली होती. त्या बैठकीत समांतर विरोधी नागरी कृती समितीचे प्रा. विजय दिवाण इतर मान्यवरही उपस्थित होते. त्यावेळी झालेल्या चर्चेनंतर आयुक्तांनी या याेजनेत मुळापासून लक्ष घालण्यासाठी योजनेचा अभ्यास सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज आयुक्तांनी समांतरबाबत एक बैठक बोलावली होती.

त्याला शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, समांतरचे अधिकारी इतर अधिकारी उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयुक्तांनी या योजनेचे पोस्टमाॅर्टेम सुरू केले आहे.

समांतर योजना ही नागरिकांसाठी असून या योजनेतून नागरिकांवर कोणताही बोजा नसावा, अशी अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी भूमिका आयुक्तांनी घेतली आहे. या याेजनेचे आर्थिक तांत्रिक माॅडेल नेमके असे आहे याची माहिती आयुक्त घेत आहेत.

तीन,चार बैठकांत फडशा
आयुक्त केंद्रेकर समांतर संदर्भात आणखी तीन, चार बैठका होतील, असे सांगितल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे येत्या महिन्यातच समांतरबाबत आयुक्त विशिष्ट निष्कर्षाप्रत येण्याची शक्यता असून त्यानंतर या योजनेबाबत काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.
एकीकडे आयुक्त केंद्रेकर यांनी समांतरचे पोस्टमाॅर्टेम करण्याचे काम हाती घेतले असले तरी दुसरीकडे राज्य सरकारने सुरू केलेली चौकशी मंदगतीनेच सुरू आहे. आॅक्टोबर महिन्यात या चौकशीचे काम सुरू झाले. चौकशी करणारी संतोषकुमार समिती तेव्हा एका दिवसासाठी येऊन गेली पण नंतर काही हालचाल झालेली नाही.

२४ तास पुरवठ्याची योजना कशी?
यायोजनेतून २४ तास पाणीपुरवठा केला जाणार आहे असे म्हटले गेले असताना तशा स्थितीत देखभालीसाठी काय तरतूद करण्यात आली आहे, उंचावरील जमिनीवरील टाक्यांची आवश्यकता नेमकी किती आहे. त्यांचे डिझाइन २४ तास पाणीपुरवठ्याचा शब्द पाळण्यासाठी योग्य आहे का याची बारीकसारीक तांत्रिक माहिती आयुक्तांनी घेणे सुरू केले आहे. त्यातून उपस्थित होणाऱ्या मूलभूत प्रश्नांना उत्तरे देताना समांतरचे घोडे दामटणाऱ्या अधिकाऱ्यांच्या नाकीनऊ येणार हे नक्की.खास करून योजनेच्या आर्थिक माॅडेलमधून या योजनेचा एकूण अर्थिक नकाशाच समोर येईल. जनतेची लूट कुठे होऊ शकते यावर प्रकाश पडणार आहे.