आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सियाचीनमधील कायदेआझम पोस्ट बनली "बानाटॉप', - परमवीरचक्र विजेते बाणासिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जम्मू आणि काश्मीरच्या सियाचीनमधील रक्त गोठविणाऱ्या उणे ४५ डिग्री तापमानात पाकिस्तानच्या सैन्याला धूळ चारत साडेएकवीस हजार फूट उंचीवरील कायदेआझम पोस्ट उद्ध्वस्त करून त्यावर कब्जा करणाऱ्या सुभेदार बाणासिंगचे नाव कोरले गेले. भारत सरकारने पोस्टचे नामकरण सुभेदार बानाटॉप असे केले. सदर पोस्टवर १९८७ मध्ये ताबा मिळविल्यानंतर तीन दिवसांनी एक ग्लास पाणी प्यायला मिळाले असल्याचे मोहीम प्रमुख परमवीर बाणासिंग यांनी सांगितले.

परमवीर बाणासिंग यांनी बुधवारी १५ जुलै रोजी "दिव्य मराठी'च्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.संपादकीय सहकाऱ्यांशी संवाद साधला त्याप्रसंगी ते बोलत होते. परमवीरचक्र विजेते बाणासिंग यांनी आपल्या खडतर लढाईची गाथाच सांगितली. जगात कुठेच झालेली आणि भविष्यात होणारी लढाई जिंकून पाकिस्तानच्या पोस्टवर कसा ताबा मिळविला हा अंगावर शहारे आणणारा अनुभव बाणासिंग यांनी सांगितला.

भारतात १९४७ नंतर आजपर्यंत २१ जणांना परमवीर चक्र पुरस्कार मिळाले आहेत. त्यापैकी केवळ एक वायुदलातील अधिकारी असून इतर वीस सैन्यातील बहादुरांना परमवीर चक्र मिळाले आहे. १४ परमवीर पुरस्कार मरणोत्तर तर सात जिवंत असलेल्यांना प्रदान करण्यात आले. देशात यातील केवळ तीन परमवीर चक्र विजेत जिवंत आहेत.

त्यात बाणासिंग, योगेंद्रसिंग यादव संजीवकुमार यांचा समावेश आहे. भारताने जम्मू आणि काश्मीरमधील सियाचीनमध्ये १९८४ पासून सैन्य ठेवण्याचा निर्णय घेतला. चीन आणि पाकिस्तान परस्परांमधील संबंध वृद्धिंगत करण्यासाठी रस्ता बनविण्याची तयारी करीत असल्याने भारताने कायमस्वरूपी पोस्ट निर्माण करण्याचा निर्णय घेतला. सियाचीनच्या रक्त गोठविणाऱ्या थंडीत एका जवान अथवा अधिकाऱ्यास केवळ सहा महिनेच ठेवले जाते. एकूण ८० कि. मी. चा भूभाग भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यावर पाकिस्तान आणि चीनची नजर आहे.

याप्रसंगी ग्रुप कॅप्टन एस. एस. पाठक, सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी शिवकुमार कहाळेकर, प्रकाश कुलकर्णी, आयसीएफचे कमांडर विनोद नरवडे आदींची उपस्थिती होती.

कब्जासाठी रणनीती आखली
परवेझमुशर्रफ पाकिस्तान सैन्याचे ब्रिगेडियर असताना त्यांनी सियाचीनवर कब्जा करण्यासाठी रणनीती आखली होती. १९८७ मध्ये पाकिस्तानच्या हालचाली टिपण्यासाठी भारताने सैन्याची एक तुकडी पाठविली. सियाचीनमध्ये राहण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य भारत पाकिस्तानने एकाच दुकानातून खरेदी केले होते. भारताने हेलिकॉप्टरच्या चारशे फेऱ्या करून सर्व साहित्य सियाचीनच्या पोस्टवर पोहोचविले. येथे पहिला सामना निसर्गाशी असतो. शत्रुशी लढण्याची वेळ फारच कमी वेळा येते. उपरोक्त तुकडी टेहळणी करण्यासाठी गेली असता पाक सैन्याने केलेल्या हल्ल्यात सात जवान ठार झाले होते. यानंतर कर्नल ए. पी. राय आणि चंद्रसेन चोकीयाल यांनी बदला घ्यायचा म्हणून आपल्यासोबत टेहळणी केली.

बदलाघेण्याची तयारी
नव्वदअंश कोनात बर्फाच्छादित टेकडीवर चढण्यासाठी दोर सोबत घेतले. दीडशे मीटर चढण्यास आठ ते दहा तास लागले. पाकिस्तानची कायदेआझम पोस्ट वर होती. चढताना पाकिस्तानने पुन्हा हल्ला केला. त्यात अनेक जवान शहीद झाले. खूप परिश्रम करूनही पोस्टपर्यंत जाणे अशक्य असल्याने पुन्हा माघारी येण्यासंबंधी संदेश दिला. तुकडीचे नेतृत्व करणारे शहीद झाले.

"करा अथवा मरा'स्थिती
पाकिस्तानवरचढाई करण्यासाठी ६२ जणांची तुकडी निवडण्यात आली. नव्याने तुकडीचे नेतृत्व नायब सुभेदार बाणासिंगला देण्यात आले. सोनम आणि अमर नावाचे कॅम्प उभारण्यात आले. पुन्हा कायदेआझम पोस्टकडे आगेकूच करताना दोन जणांचे रक्त गोठल्याने निधन झाले. अनेक जणांना अस्वस्थ वाटू लागले. मे महिना होता आणि जूनमध्ये भारतीय सैन्याचा हल्ला करण्याचे नियोजित होते. तोपर्यंत जवान निसर्गाशी सामना करताना मृत्युमुखी पडतील म्हणून लवकर हल्ला करावा अशा एका सैनिकाचा सल्ला सर्वांना पटला.

पुढेसरकता येईना
कुठल्याहीपरिस्थितीत पोस्ट घ्यायची असा आदेश आल्यानंतर चढाईस प्रारंभ केला. २११५३ फूट उंचावर निसर्गापुढे काहीच चालत नव्हते. थोडे ऊन पडल्याची संधी साधत जवान पेटून उठले. अशा उन्हात चेहरा मोठ्या प्रमाणावर भाजतो. इथे मरण्यापेक्षा शत्रुंशी लढून मरा असा आदेश देण्यात आला. दोरखंडाने बर्फावर चढाई सुरू झाली. पाकिस्तानी सैन्याने मारा सुरू केला. भारताने प्रत्युत्तर देण्यास प्रारंभ केला. अनेक जवानांना गोळ्या लागल्याने ते शहीद झाले. भारतीय सैन्याच्या जोरदार लढ्यात चाळीसपेक्षा जास्त पाकिस्तानी जवान मारले गेले. आमची अवस्थाही अत्यंत वाईट झाली होती. तुफान बर्फबारीत ती पोस्ट आम्ही सोडली नाही. तीन दिवस पाण्याविणाच होतो. चौथ्या दिवशी हेलिकॉप्टरच्या पेट्रोलवर बर्फाला तापविले एक ग्लास पाणी प्यायलो. बाणासिंगच्या पराक्रमाबद्दल भारत सरकारने या पोस्टचे नामकरण बाना टॉप असे केले. त्यांना १९८७ मध्ये परमवीर चक्र बहाल केले.
बातम्या आणखी आहेत...