आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिस्टर इंडिया दारासिंग म्हणाला, अंतिम 10 जणांच्या यादीत येईपर्यंत घरच्यांपासून लपवली माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - इतिहासात पहिल्यांदाच मराठवाड्यातील मुलगा मिस्टर इंडिया स्पर्धेचा विजेता ठरला. परभणीच्या दारासिंग खुराणा याने कुठल्याही ग्रुमिंग कार्यशाळेशिवाय खेचून आणलेले हे यश विशेष उल्लेखनीय आहे. आगामी मिस्टर इंडिया स्पर्धेसाठी तयारी करत असलेल्या दारासिंगने सोमवारी (४ सप्टेंबर) या स्पर्धेतील यशाची माहिती दिली. यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत त्याने अनेक गोष्टींचा उलगडा केला. अंतिम दहा जणांच्या यादीत येईपर्यंत घरच्यांपासून स्पर्धेतील सहभागाची माहिती लपवली होती, असे त्याने सांगितले.
 
परभणीत दहावीपर्यंतचे शिक्षण घेतलेला राजबिंड्या व्यक्तिमत्त्वाच्या दारासिंगने मागील ११ वर्षांच्या प्रवासाबद्दल सांगितले. तो म्हणाला, माझे १०वीपर्यंतचे शिक्षण परभणीत झाले. त्यानंतर पुण्यात सिंबायोसिस अन् मुंबईत एचआर कॉलेजमध्ये बीकॉम केले. एमबीएचे झाल्यावर मार्केटिंग, फिल्म असिस्टंट, मीडिया क्षेत्रात नोकरीही केली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर परभणीत कौटुंबिक व्यवसायात यावे, अशी कुटुंबाची इच्छा होती. मात्र, माझ्या मनात काही और होते. याचे बीज १० वीच्या शाळेत मिळालेले मिस्टर बेस्ट स्टुडंट पुरस्कारात रोवली गेली होती. त्याक्षणी पहिल्यांदा मला मिस्टर इंडिया व्हावे, असे वाटले होते. या स्वप्नावर पुण्यात गेल्यावर मात्र एक पडदा आल्यासारखे झाले. मात्र, पुढे मुंबईच्या कॉलेजात जेव्हा मी मिस्टर फ्रेशर किताब जिंकला तेव्हा पुन्हा माझे स्वप्न चमकू लागले. फॅशन इंडस्ट्रीत काम करताना ऋतिक रोशन, सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरुण धवन यांचे स्टायलिंगचे काम पाहिले. 
 
मिस्टर इंडियासारख्या स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी प्रत्येक मुलगा ग्रुमिंग क्लास करतो. पण, मला फॅशन कन्सल्टंट म्हणून काम करताना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. खरे तर ग्रुमिंगपेक्षा या क्षेत्रात निरीक्षणातून माणूस खूप शिकतो. स्पर्धेची ऑडिशन्स सुरू झाल्याचे कळले. मग, मीही सहभागी झालो. ११०० मुलांमधून ३० जणांत माझी निवड झाली. पण, माझ्या कुटुंबातून मला खूप विरोध होता. म्हणून मी याबद्दल कुणाला ब्र शब्ददेखील सांगितला नाही. यानंतर जेव्हा शेवटच्या १० मध्ये मी आलो, तेव्हा घरी सांगितले अन् सर्व जण खुश झाले. २७ ऑगस्टला अंधेरीला झालेल्या शेवटच्या फेरीत मी विजयी ठरलो. तेव्हा १० वीत मिळालेल्या पुरस्काराची आठवण झाली.
 
मिस्टर इंटरनॅशनल एकही नाही 
आजवर झालेल्या स्पर्धांमध्ये एकही मिस्टर इंडिया आंतरराष्ट्रीय पातळीवरील मिस्टर इंटरनॅशनल स्पर्धेच्या पहिल्या फेरीलादेखील मात करू शकलेला नाही. सध्या मी या स्पर्धेचा अभ्यास सुरू केला आहे. महिन्यांनी होणाऱ्या या स्पर्धेत मी स्वत:चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नव्हे, तर देशाचे करण्यासाठी भाग घेणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...