आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शालेय साहित्य खरेदीसाठी गर्दी; मुलांना ‘छोटा भीम’ची क्रेझ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जून महिना उजाडल्यामुळे शालेय साहित्य खरेदीला वेग आला आहे. स्टेट बोर्ड, सीबीएसई, आयसीएससी अशा विविध अभ्यासक्रमांच्या पुस्तकांची खरेदी आणि त्यासोबत मुलांना आकर्षित करणारे कंपास यांनी बाजारपेठ फुलून गेली आहे. अभ्यासक्रमांच्या व्हिडिओ सीडीलाही पालकांचा प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या, दुस-या वर्गांचा अभ्यासक्रम बदलला असल्याने ही पुस्तके अजून बाजारात आलेली नाहीत. मात्र, इतर वर्गांची पुस्तके खरेदी करण्यासाठी पालकांनी गर्दी केली आहे. दुकानांमध्येही विविध शाळांच्या आवश्यकतेनुसार वह्या, पुस्तकांचे पॅकेजच तयार करण्यात आले आहेत. त्या यादीनुसार तत्काळ विक्री होत आहे. नवनीत आणि क्लासमेट या कंपन्यांच्या इकोफे्रन्डली वह्यांकडे सर्वांचाच ओढा आहे.


छोटा भीमची क्रेझ
शाळेच्या कंपासमध्ये मोठ्या प्रमाणात वैविध्य आलेले आहे. बटण दाबून शार्पनर, कॅलक्युलेटर, कंपासातील खाणे उघडण्याची सोय मुलांना आकर्षित करत आहे. गेल्या वर्षीपर्यंत बार्बीचे कंपास आणि पाऊचेस याचा बोलबाला होता. मात्र, यंदा अँग्रीबर्डबरोबरच छोटा भीमची क्रेझ आहे. चायना मेड असलेल्या या सर्व वस्तू वैविध्यपूर्ण आकार आणि रंगसंगतीत उपलब्ध असल्याने बच्चेकंपनीला चांगलेच आकर्षित करत आहे.


परदेशी कंपन्यांनी व्यापली बाजारपेठ
कंपास, पाऊच, वॉटरबॅगमध्ये चायना वस्तूंनी तर पुस्तकांच्या प्रकाशनात मोठ्या प्रमाणात परदेशी कं पन्यांचा बोलबोला आहे. ऑक्सफोर्ड, केंब्रिज, मॅकमिलन, फ्रँ क ब्रदर्स, ओरिएंट, ब्लॅक स्वॉन असे विविध 20 प्रकाशकांचा बाजारात दबदबा आहे.


सीडीजची नवी बाजारपेठ
ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमातून समजावून सांगण्यात आलेल्या संकल्पना अधिक लवकर समजतात ही पद्धती लक्षात घेऊन झंकार, ऑप्टिमा आणि टीबीसीसारख्या अनेक कंपन्या अभ्यासक्रमांच्या सीडींची निर्मिती करत आहेत. अभ्यासात फायदा होत असल्याने पुस्तक, वह्यांसोबत अभ्यासक्रमाच्या या सीडींनाही पसंती मिळत आहे.


एकाच छताखाली सर्व साहित्य
प्रत्येक शाळेच्या लहानसहान बाबी या वेगवेगळ्या असतात. त्यानुसार प्रत्येक शाळेची आवश्यकता लक्षात घेऊन आम्ही नियोजन करतो. पालकांना एकाच दालनात नेमके हवे ते मिळत असल्याने त्यांची सोय होते.
बालू स्वामी,संचालक आरती बुक सेंटर


कंपासचे आकर्षण अधिक
प्रत्येक शाळेच्या वह्या, पुस्तकांचा संच ठरलेला असल्याने मुलांना फक्त पाऊच आणि कंपास, वॉटर बॅगमध्ये स्वत:ची मर्जी चालवता येते. त्यांना आकर्षित करणारे अँग्रीबर्ड आणि छोटा भीम सध्या जोरात आहेत.
ओमप्रकाश पाटील, प्रकाश स्टेशनर्स


नेमके हवे ते मिळते
मुलांना शालेय पुस्तकांसोबतच विविध अनेक गोष्टींची आवश्यकता असते. प्रत्येक वेळी पालकांना ते नेमके माहिती असतेच असे नाही. तेव्हा दुकान ठरलेले असले आणि अमुक शाळेची इतक्या वर्गाची पुस्तके द्या म्हटले की काम सोपे होते. मात्र, गर्दी प्रचंड असल्याने वेळ लागतो. आम्ही बराच वेळापासून रांगेत आहोत. माझ्या मुलीची आठवीची पुस्तके घेत आहोत.
दीपाली कुलकर्णी, पालक