आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पळून गेलेल्या मुलासाठी पालकांचे पोलिसांकडे खेटे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- आपल्या हातून शाळेच्या आवारातील विजेचा बल्ब फुटल्याने आता आपली खैर नाही. गुरुजी मारतील, या भीतीने राजेंद्र रामलाल वाघ हा सात वर्षांचा मुलगा दीड महिन्यापासून बेपत्ता झाला आहे. मुलाचे आई-वडिल वारंवार ठाण्यात जात असून तक्रारीकडे पोलिस अधिकारी कानाडोळा करीत आहेत.

देवळाई भागातील भगवान बाबा चॅरिटेबल संस्थेच्या निवासी शाळेत राजेंद्र आणि त्याचा थोरला भाऊ वर्षभरापासून शिकत आहेत. राजेंद्र हा दुसरीत, तर विशाल हा पाचवीत शिकत आहे. त्यांचे आई-वडील ऊसतोड कामगार आहेत. आपल्याला लिहिता-वाचता येत नाही. आपल्या मुलांवर ही वेळ येऊ नये म्हणून रामलाल वाघ यांनी चारपैकी दोन मुलांना आर्शमशाळेत घातले. दीड महिन्यापूर्वी वाघ दांपत्य नांदेडजवळील बालाघाट येथे ऊसतोडणीला गेले. त्यांचा मुलगा राजेंद्र शाळेतून पळून गेल्याची बातमी कळाली. त्यांनी आर्शमशाळेत धाव घेतली. शिक्षकांना विचारपूस केली. बल्ब फुटल्याचे कारण समोर आले. आई-वडील आणि शिक्षक दीड महिन्यापासून त्याचा शोध घेत आहेत. जवाहरनगर व सातारा पोलिसांकडे तक्रार घेऊन गेले मात्र त्यांना उडावाउडवीची उत्तरे मिळत आहेत. तुमचा मुलगा नेमका कोणत्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झाला याची शहानिशा करा, असा सल्ला ते आई-वडिलांना देत आहेत.

आम्ही राजेंद्रचा शोध घेतोय

राजेंद्र घरी पळून गेला होता, तो आलाच नाही. आम्हीच या दोघांचे जीवन सुधारावे, त्यांनी शिक्षण घ्यावे म्हणून शाळेत दाखल करून घेतले होते. मात्र, राजेंद्र हा कायम पळून जात होता. बल्ब फुटण्याचा प्रसंगानंतर ते घाबरले असतील. मात्र, त्यांची समजूत काढल्यानंतर त्याचा थोरला भाऊ विशाल परत आला. आम्हीदेखील राजेंद्रचा शोध घेत आहोत. तो मुकुंदवाडीकडे दिसल्याचे काही लोकांनी सांगितले. कविता वाघ, मुख्याध्यापिका, भगवानबाबा आर्शमशाळा

बल्ब फुटल्याच्या भीतीने पळाला

राजेंद्र आणि त्याचा भाऊ विशाल शाळेच्या परिसरात खेळत असताना नकळत त्यांच्या हातातून बल्ब फुटला. आता सर आपल्याला रागावतील या भीतीपोटी दोघेही गादिया विहार परिसरात त्यांच्या नातेवाइकांकडे गेले. दुसर्‍या दिवशी विशाल शाळेत परतला. मात्र, राजेंद्र बेपत्ता झाला. शिक्षक आणि पोलिसांच्या मते तो शहरातच असावा. शाळा व्यवस्थापनाचे म्हणणे आहे, तो घरून पळून गेला, तर त्याच्या आई-वडिलांच्या मते तो शाळेतूनच गायब झाला. या दोघांच्या वादात पोलिसदेखील चक्रावून गेले आहेत. त्याचा शोध सातारा पोलिसांनी करावा की जवाहरनगर पोलिसांनी, असा संभ्रम निर्माण झाला आहे.