आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅरिसची ‘हाऊस ऑन व्हील्स’ औरंगाबादेत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण असलेल्या ‘हाऊस ऑन व्हील्स’मधून म्हणजेच खास कॅम्पर व्हॅनमधून दोन फ्रेंच कुटुंबीय आपल्या मुलांसह पॅरिसहून औरंगाबादला आले आहेत. तब्बल सहा महिन्यांपासून हे विश्वभ्रमण सुरू असून पुढील सहा महिन्यांपर्यंत चालणार आहे. त्यासाठी चाळिशीतील दोन्ही जोडप्यांनी आपल्या नोकरी-व्यवसायातून एक वर्षाची सुटी घेतली आहे.

ही दोन कोटी 10 लाखांची भव्यदिव्य व्हॅन खास प्रवासासाठी तयार करून घेण्यात आली आहे. दहा कोटींपर्यंत किंमत असलेल्या या प्रकारच्या व्हॅन फ्रान्समध्ये उपलब्ध असल्याचे फ्रेंच जोडप्यांनी सांगितले. पूर्णपणे एअर कंडिशन्ड असलेल्या व्हॅनमध्ये किचन, गॅस, मायक्रोओव्हन, फ्रिज, स्टडीरूम, बेडरूम, टॉयलेट, बेसिन, बाथरूम, रेस्टरूम अशा सगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा आहेत. यातील बरेचसे फर्निचर असे आहे, जे पूर्णपणे फोल्ड होऊन त्याचा बेड तयार होऊ शकतो किंवा स्टडी टेबल होऊ शकतो. मुलांच्या अभ्यासासाठी, आरामासाठी स्वतंत्र जागा आहे. लख्ख सूर्यप्रकाश किंवा हवा येण्यासाठी वरच्या भागात दोन ठिकाणी स्लायडिंग विंडो केल्या आहेत. बाहेरचा प्रकाश किंवा हवा येण्यासाठी तसेच बंद होण्यासाठी स्लायडिंग शीट्स आहेत. सौरऊज्रेसह इलेक्ट्रो जनरेटरमुळे व्हॅन धावू लागताच वीजनिर्मिती होते व उपकरणे निर्धोकपणे चालतात. जीपीएस सिस्टिममुळे कोणत्याही देशातील ठिकाण सापडू शकते व नेमक्या त्या ठिकाणी पोहोचता येते, असे पेरिन मायकेल व त्याची पत्नी पेरिन सोफी आणि टेम्पे क्लाऊडर व त्याची पत्नी टेम्पे क्लेरिस यांनी सांगितले. एमटीडीसीतर्फे या पर्यटकांची व्यवस्था करण्यात आली.

30 टक्के वाहने कॅम्पर टूरिझमची
फ्रान्समध्ये सुमारे 25 ते 30 टक्के वाहने ही या व्हॅनच्या प्रकारातील आहेत. पर्यटनासाठी फिरणे ही फ्रान्समधील लोकांची मनापासून आवड असल्याने या प्रकारच्या वाहनांना मोठी मागणी आहे, असे स्वत: पॅरिसमध्ये मोठय़ा हौसेने चक्क हाऊस बोटीत राहणारे मायकेल यांनी सांगितले. आपली पत्नीही सर्रास व्हॅन चालवते, असेही त्यांनी सांगितले.