आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्किंगसाठी शहरातील कोचिंग क्लासेसना १५ दिवसांची मुदत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सकाळीफिरायला निघालेल्या मनपा आयुक्त प्रकाश महाजनांच्या नजरेला शहरातील कोचिंग क्लासेसच्या बाहेर रस्त्यावर बेलगामपणे पार्क केलेल्या दुचाक्या पडल्या. मग त्यांनी त्याचे मोबाइलमध्ये व्हिडिओही काढले. त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे आज त्यांनी शहरातील क्लासचालकांना बोलावून घेतले हा प्रकार निदर्शनास आणून दिला. येत्या १५ दिवसांत तुमच्या पार्किंगची सोय तुम्ही करा नाहीतर कडक कारवाई करतो असा इशारा त्यांनी दिला.
क्लासेसपाठोपाठ रस्त्यावर बिनधास्त पार्किंग करायला भाग पाडणाऱ्या दवाखाने मंगल कार्यालय चालकांनाही बोलावून त्यांनाही अल्टिमेटम देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
शहरातील बहुसंख्य संकुलांनी पार्किंगची जागा गिळंकृत केल्याने वाहनांचे रस्त्यांवरच पार्किंग सुरू असते. याचा वाहतुकीला तसेच सर्वसामान्य नागरिकांना नेहमीच त्रास होत आहे. पार्किंग खाणाऱ्या बिल्डरांवर मनपाने कधीच काहीही कारवाई केली नाही. अगदी उच्च न्यायालयाने आदेश देऊनही मनपाने या बिल्डरांना कायमच अभय दिलेले आहे. पण त्यामुळे रस्त्यावरील पार्किंगची समस्या दिवसागणिक आणखी बिकट बनली आहे.

ही अवस्था कशी आहे हे मनपा आयुक्त प्रकाश महाजन यांना नुकतेच बघायला मिळाले. फेरफटका मारण्यासाठी दोन दिवसांपूर्वी निघालेल्या आयुक्तांना शहरात सकाळीच कोचिंग क्लासेसच्या बाहेर रस्ता खाऊन टाकणाऱ्या दुचाकी वाहनांचे बेकायदा पार्किंग पाहायला मिळाले. हा प्रकार पाहून थक्क झालेल्या आयुक्तांनी त्याचे आपल्या मोबाइलमध्ये व्हिडिओही शूट केले. त्यानंतर उपायुक्त अय्युब खान यांना शहरातील क्लास चालकांना बैठकीला बोलावण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यानुसार आज डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात शहरातील ६५ कोचिंग क्लासेसच्या संचालकांची बैठक बोलावण्यात आली होती. त्याला २५ क्लासेसचेच संचालक उपस्थित होते. आयुक्तांनी त्यांना आपण पाहिलेली अवस्था तर सांगितलीच शिवाय किती क्लासेसकडे पार्किंगची व्यवस्था नाही याचीही माहिती घेतली. बहुतेक क्लासेसनी पार्किंगसाठी जागा नसल्याचे समोर आले. त्यानंतर अायुक्तांनी या क्लासचालकांना येत्या १५ दिवसांत पार्किंगची तुमची तुम्ही व्यवस्था करा, भाड्याने घ्या पण रस्त्यावर वाहने लागू देऊ नका असा इशारा दिला. या सूचनांचे पालन झाल्यास कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे. याबाबत आयुक्त महाजन म्हणाले की, क्लासेससारखीच स्थिती शहरातील दवाखाने मंगल कार्यालये यांच्यासमोरही पाहायाला मिळते. त्यामुळे आता त्यांनाही बोलावून घेऊन निर्वाणीचा इशारा दिला जाणार आहे.

कमानींचे टेंडर
शहरातमनपाच्या मालकीच्या २० कमानी असून त्यांच्यावर जाहिराती लावण्यासाठी मनपा टेंडर काढत असते. कायम कोर्टबाजी होणाऱ्या या कमानींसाठी याहीवेळी टेंडर काढण्यात आले. आतापर्यंत प्रति कमान हजार रुपये भाडे आकारले जात होते. यंदा तर टेंडरवरूनही कोणी कोर्टात गेले नाही आणि ज्या कंत्राटदाराने कंत्राट भरले त्यांनीही मनपाला २२ हजार रुपये भाडे देण्याची तयारी दर्शवली असल्याचे आयुक्तांनी सांगितले.