आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: महाविद्यालय मान्यतेतच पार्किंगची अट, तरीही विद्यार्थ्यांकडून सर्रास उकळले जाते शुल्क

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- ना नफा- ना तोटा तत्त्वावर चालवल्या जाणाऱ्या शाळा - महाविद्यालयांच्या संस्थाचालकांनी व्यावसायिक आस्थापना बनवून टाकल्या असून विद्यार्थ्यांसाठी पार्किंगची पुरेशी जागा असल्याच्या ज्या अटीवर मान्यता मिळवली, तिलाच हरताळ फासत शहरातील नामांकित महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून मनमानी पार्किंग शुल्क वसूल करत आहेत. 
 
महाविद्यालये या बिगर व्यावसायिक संस्था आहेत, अशी धारणा असल्याने सरकार अगदीच नाममात्र भाडेपट्ट्यावर कोट्यवधी रुपये किमतीच्या काही एकर जागा शैक्षणिक संस्थांना देते. या जागेचा व्यावसायिक वापर करू नये, असे लीज डीडमध्ये नमूदही असते. विद्यार्थ्यांसाठी पार्किंगची पुरेशी जागा आहे की नाही, याची पाहणी करूनच शिक्षण विभाग महाविद्यालयांना मान्यता देते. असे असतानाही बहुतांश महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या दुचाकी पार्किंगसाठी शिक्षण विभागाचे नियम धाब्यावर बसत आहेत. सुरक्षेच्या नावाखाली महाविद्यालये हे पार्किंग शुल्क लुटत आहेत. 
 
- काही महाविद्यालयांत नि:शुल्क पार्किंग, मग काही महाविद्यालयांतच लूट कशी? 
या महाविद्यालयांत दररोज लूट 
- देवगिरी महाविद्यालय
- सरस्वती भुवन महाविद्यालय 
- देवगिरी इंजिनिअरिंग कॉलेज 
- विवेकानंद महाविद्यालय 
- वसंतराव नाईक महाविद्यालय 
- छत्रपती महाविद्यालय 

नि:शुल्क पार्किंग 
- मौलाना आझाद कॅम्पस 
- एमजीएम कॅम्पस 
- नागसेन वनातील सर्व महाविद्यालये 
- श्रीयश इंजिनिअरिंग कॉलेज 
- एमआयटी कॉलेज 
- शासकीय अभियांत्रिकी 

एमआयटीमध्ये हेल्मेट असेल तरच पार्किंग करू दिले जाते 
यांनानि:शुल्क पार्किंग परवडते वाहन सुरक्षेचा मुद्दाही भेडसावत नाही. मग उर्वरित महाविद्यालयांनाच कसा भेडसावतो? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. 
 
नियमातील असंदिग्धतेचा गैरफायदा घेत लूट 
शिक्षण विभागाच्या नियमानुसार शाळा- महाविद्यालयांत पार्किंगची सोय अनिवार्य आहे. मात्र, त्यासाठी पैसे घ्यावेत की नाही, याबाबत नियमात स्पष्टता नाही. त्याचाच गैरफायदा घेत वाहन सुरक्षेच्या नावाखाली बहुतांश महाविद्यालये पार्किंगच्या नावाखाली नफेखोरी करत आहेत. काही महाविद्यालयांत तर बसच्या पासेसप्रमाणे पार्किंग पासेसही दिले जात आहेत. महाविद्यालय व्यवस्थापनाकडून या लुटीचे समर्थनही केले जात आहे. 

महाविद्यालयांत बेकायदा विनापावती पार्किंग वसुली
पार्किंग हे महाविद्यालयाचे नफेखोरीचे साधन बनले असून त्यातून वर्षाला लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. शुल्क भरूनही विद्यार्थ्यांना चांगली पार्किंग व्यवस्था मिळतेच असे नाही. विशेष म्हणजे गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या प्राध्यापकांना पार्किंग शुल्क आकारले जात नाही. त्यांच्यासाठी पार्किंगचीही उत्तम सोय आहे. 
 
प्रत्येक महाविद्यालयाच्या पार्किंग कंत्राटाचे रेट वेगळे असून, शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयात एक लाख रुपयांत एक वर्षाचे कंत्राट देण्यात आले आहे. काही महाविद्यालये कंत्राटदाराकडून दरमहा पैसे घेतात. 
 
गाड्यांचे पार्किंग असे : देवगिरी महाविद्यालयात रोज साधारणपणे हजार एक गाड्या पार्क होतात. स. भु. महाविद्यालयात पाचशे ते सातशे विद्यार्थी गाडी पार्किंगमध्ये लावतात. विवेकानंद कॉलेजमध्येही हजार ते बाराशे तर शिवछत्रपती महाविद्यालयात रोज पाचशेहून अधिक विद्यार्थी पार्किंगमध्ये गाडी पार्क करतात. 
 
उघडे पार्किंग : खासगी व्यक्तीला कंत्राट देऊन महाविद्यालयांकडून वसूल केले जाणारे पार्किंग शुल्क वेगवेगळे आहे. नियमानुसार पार्किंग आच्छादित असावे. पण, एकाही महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठीचे पार्किंग आच्छादित नाहीच. उघडेच आहे. 

पावती दिली जात नाही : पैसे घेतल्यावर पावती देणे अपेक्षित आहे; परंतु शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय वगळता कुठेच पावती पार्किंग शुल्क घेतल्यावर देताना दिसून आले नाही. 
 
पार्किंग शुल्क असे (दररोज) 
सायकल: 5 रुपये 
दुचाकी : १० रुपये 
चारचाकी : २० रुपये 
 
महिन्याचा पास 
दुचाकी: ८० रुपये 
सायकल : ४० रुपये 
चारचाकी : १०० रुपये 
 
पार्किंगमध्ये अरेरावी, टगेगिरी करणाऱ्यांकडे कंत्राट  
विद्येची मंदिरे मानल्या जाणाऱ्या महाविद्यालयांतील बहुतांश पार्किंग कंत्राटदारांनी वसुलीसाठी ठेवलेली मुले अरेरावी करतात. त्यांची शरीरभाषाच त्यांचे वर्तन सांगण्यास पुरेशी ठरते. त्यामुळे निमूटपणे पैसे देण्याशिवाय विद्यार्थ्यांना गत्यंतर नसते. 
 
बातम्या आणखी आहेत...