आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खंडोबाच्या यात्रेत पार्किंगची व्यवस्था संस्थान करणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - साताऱ्याचे ग्रामदैवत असलेल्या खंडोबाची यात्रा आठ दिवसांवर आली असून संस्थानच्या वतीने तयारीसाठी लगीनघाई सुरू आहे. यात्रेत येणाऱ्या भाविकांसाठी पार्किंगची व्यवस्था संस्थानच्या विश्वस्तांकडून करण्यात येणार आहे. त्यासाठी सोमवारी सकाळी अकरा वाजता मंदिरात लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. गेल्या वर्षी पार्किंगमधून ५९ हजार रुपयांचा महसूल मिळाला होता.
यात्रेनिमित्त विश्वस्तांकडून शनिवारीच पोलिस प्रशासन, महानगरपालिका, महावितरण आणि अन्य विभागांची बैठक घेण्यात आली होती. यात सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विश्वस्तांनी सर्व शासकीय विभागांना सूचना केल्या. या वेळी यात्रेसाठी पोलिस प्रशासनाने दीडशेच्या जवळपास फौजफाटा तैनात करण्याची तयारी दर्शवली. महावितरणकडूनही वीज खंडित होऊ देण्यासाठी जोर लावण्यात आला आहे. यात महत्त्वाची जबाबदारी महानगरपालिकेची असून त्यांना रस्ते, पाणी, शौचालय, आरोग्य सुविधा, पथदिवे आणि अग्निशमनच्या गाडीची व्यवस्था करावी लागणार आहे. महानगरपालिकेने मात्र अद्याप केवळ नियोजन सुरू असल्याचे सांगितले. त्यांनी केलेल्या नियोजनानुसार काम कधी होणार, याबाबत स्पष्ट करण्यात आलेले नाही. शनिवारी झालेल्या बैठकीत केवळ अग्निशमन विभाग, महावितरण आणि आरोग्य विभागाला पत्र देण्यात आल्याची माहिती देण्यात आली. प्रत्यक्षात सुविधा कधी देणार याबाबत काहीच सांगण्यात आलेले नव्हते. या बैठकीसाठी संस्थानचे अध्यक्ष साहेबराव पळसकर, नंदकुमार दांडेकर, सोमिनाथ शिराणे, व्ही. आर. सातपुते, दौलत चव्हाण, गंगाधर पारखे, विठ्ठल नरोडे, सुशील घोंगडे, आकाश धुमाळ, नामदेव सातपुते, गणेश खोरे, कैलास सातपुते, मुरलीधर झरेकर, परमेश्वर नरोडे, बापू पारखे आदींची उपस्थिती होती.

मनपाने आमच्यावर जबाबदारी दिली
^आतापर्यंत पार्किंगची व्यवस्था संस्थानच्या वतीने करण्यात येत होती. ज्यांची जागा आहे, त्यांना विनंती करून तात्पुरती जागा घेतो. महानगरपालिकेकडे त्यांची जागा उपलब्ध नाही. त्यामुळे मनपाने आमच्यावर पार्किंगची जबाबदारी दिली. साहेबरावपळसकर, संस्थानचे अध्यक्ष.

तीन ठिकाणी असणार पार्किंगची व्यवस्था
खंडोबायात्रेत येण्यासाठी मुख्य तीन रस्ते असून पहिला रस्ता एमआयटी ते खंडोबा मंदिराचा आहे. या रस्त्यावर एमआयटी महाविद्यालयाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत पार्किंगची व्यवस्था करण्यात येते. दुसरा रस्ता पोलिस ठाण्याचा, आमदार रोडवरून संभाजी चौकातून अहिल्यादेवी होळकर चौकापर्यंतचा आहे. होळकर चौकाच्या बाजूला सध्या मोकळी जागा असून त्या ठिकाणीही पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तिसरा रस्ता कांचनवाडीमार्गे सातारा गाव असा आहे. या रस्त्यावर चोपडे वस्तीजवळच पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे भाविकांना वाहने उभे करता येतील.

आज होणार लिलाव
यात्रेनिमित्त विश्वस्तांना इतरही कामे करावी लागणार असल्याने एकेक कामे उरकण्यावर संस्थानचा भर आहे. सोमवारी पार्किंगचा विषय मार्गी लावला जाईल. सकाळी अकराला खंडोबा मंदिरात पार्किंगचा लिलाव करण्यात येणार आहे. त्याचबरोबर येथे लावण्यात येणाऱ्या दुकानांचाही लिलाव उद्या होण्याची शक्यता असून यातून संस्थानला काही प्रमाणात उत्पन्न मिळणार आहे. गेल्या वर्षी तिन्ही पार्किंगच्या माध्यमातून ५९ हजार रुपये मिळाले होते.
बातम्या आणखी आहेत...