औरंगाबाद - वीज निर्मितीसाठी आवश्यक डिझेल, गॅस इंजिनचे उत्पादन करणा-या पर्किन्स इंडिया कंपनीचा प्रकल्प शेंद्रा औद्योगिक वसाहतीत जानेवारी 2015 मध्ये कार्यान्वित होण्याच्या मार्गावर आहे. 903 कोटी 22 लाखांची गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पातून 1500 जणांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगाराची संधी मिळेल. पर्किन्सला लागणा-या सुट्या भागांची निर्मिती स्थानिक उद्योजकांच्या सहभागातून करण्याचे करारही होणार आहेत. त्यातून पहिल्या टप्प्यात 100 कोटींची उलाढाल अपेक्षित आहे.
व्यवस्थापकीय संचालक रिचर्ड कॉरटेल यांनी नुकताच राज्य शासनासोबत सामंजस्य करार केला. प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर 4000 सिरीजमधील इंजिने बनवली जातील. पहिल्या वर्षी 3 हजार इंजिन्सचे उद्दिष्ट असून ही क्षमता 5000 इंजिन्सपर्यंत जाईल. डाटा सेंटर्स, रिअल इस्टेट, मोठे कारखाने, रुग्णालयांमध्येही या इंजिनांचा वापर होतो. पर्किन्सचे 180 देशांत 100 वितरक, 3500 सेवा केंद्रे आहेत.
औरंगाबादेत काय?
25 व्यवस्थापकीय अधिकारी (एमबीए वा तत्सम पदवीधारक)
25 कर्मचारी :विज्ञान, वाणिज्य पदवीधर
400 तांत्रिक कर्मचारी (अभियंते, आयटीआय ट्रेड्समन)
750 अकुशल कंत्राटी कामगार
स्थानिक लघुउद्योगांना चालना
सुटे भाग, कच्च्या मालासाठी औरंगाबादच
पर्किन्सला लागणारा कच्च माल व सुटे भाग मुंबई, पुण्यातून मागवण्याचे नियोजन प्रारंभी होते. मात्र, सीआयआयचे अध्यक्ष प्रशांत देशपांडे, सीएमआयएचे अध्यक्ष मिलिंद कंक यांनी कंपनीशी चर्चा केली. त्यानुसार औरंगाबादेतीलच काही उद्योजकांकडून सुटे भाग, कच्च माल घेण्याची तयारी झाली आहे. यामुळे पहिल्या वर्षी वाळूज, चिकलठाण्यातील उद्योगांत 100 कोटींची उलाढाल होईल.