आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Party Worker Demands Modi Rally For Maharashtra Assembly Election

वेध विधानसभा निवडणुकीचे : अबकी बार. राज्यात मोदींच्या सभांचा बार!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘यूपीए’चा सफाया करून एकहाती सत्ता मिळवणारे नवनिर्वाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांना महाराष्ट्रातून मोठी मागणी होत आहे. ऑक्टोबर महिन्यात राज्याच्या विधानसभा निवडणुका होत असून महाराष्ट्रातही सत्तापालट करण्यासाठी मोदींनी प्रत्येक विभागात एक तरी सभा घ्यावी, अशी मागणी भाजप नेत्यांकडून प्रदेश व राष्ट्रीय कार्यकारिणीकडे केली जात आहे.

लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभांनी संपूर्ण देशभरातील वातावरण पालटून गेले होते. देशात एकहाती सत्तापालटाचा चमत्कार एकट्या मोदींनी करून दाखवला. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर केवळ देशातूनच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही कौतुकाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्रातही ‘मोदींची लाट’ इतकी प्रभावी ठरली की केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रतीक पाटील, मिलिंद देवरा यांच्यासह राज्यातील मंत्री छगन भुजबळ, सुनील तटकरे यासारख्या अनेक दिग्गजांनाही पराभवाचा सामना करावा लागला. हीच लाट विधानसभेतही कायम राहावी यासाठी भाजप-शिवसेनेकडून प्रयत्न केले जात आहेत.

राज्यातील विधानसभा निवडणुकांना आणखी पाच महिन्यांचा अवधी आहे. आचारसंहिता जाहीर होताच किंवा तत्पूर्वी वातावरण निर्मितीसाठी मोदींनी प्रत्येक विभागात एक तरी सभा घ्यावी व राज्यात महायुतीची सत्ता आणण्याचे स्वप्न पूर्ण करावे, अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आशा वाटत आहे. महायुतीच्या प्रचाराचा नारळ नरेंद्र मोदी यांनी तुळजापूर येथील कुलस्वामिनी र्शी तुळजाभवानी मातेच्या दरबारात वाढवावा, अशी सर्वच कार्यकर्त्यांची इच्छा आहे. भाजपच्या संसदीय बोर्डाकडे याबाबत मागणी करणार असल्याचे पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांनी सांगितले.

नांदेड, बीडमधून मागणी
नांदेड जिल्ह्यातील युतीचा एकही आमदार नाही. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोदींची सभा झाल्याने कॉँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनाही विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. त्यामुळे विधानसभेसाठी जिल्ह्यात मोदींची सभा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे भाजपचे जिल्हा संघटक गंगाधरराव जोशी यांनी सांगितले. गोपीनाथ मुंडे यांच्या बीड जिल्ह्यातही भाजपचा केवळ एक आमदार असून राष्ट्रवादीकडे पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. या जिल्ह्यातही वातावरण बदलण्यासाठी मोदींची सभा घेण्याचा प्रयत्न आहे. नगर व बीड या दोन जिल्ह्यांसाठी किमान आष्टीत तरी एखादी सभा व्हावी असा प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचे पक्षाचे प्रदेश संघटनमंत्री प्रवीण घुगे व जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी सांगितले. मराठवाड्याच्या इतर जिल्ह्यांतील पदाधिकार्‍यांकडूनही अशीच मागणी पुढे येत आहे.
विदर्भालाही हवी ‘छत्रछाया’
विदर्भातही मोदींचा झंझावात पुन्हा एकदा व्हावा, अशी आशा स्थानिक नेत्यांना आहे. त्यामुळे त्यांची सभा निश्चितपणे घेतली जाईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. केंद्रात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभेच्या नियोजनाला खर्‍या अर्थाने सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूर, अमरावती, बुलडाणा, अकोला, यवतमाळ यासह विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना मोदींच्या सभेची प्रतीक्षा आहे.