आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवाशांनी शोधला सीटर रिक्षाचा मार्ग; प्रवासी, रिक्षाचालकांचे परस्पर संमतीने 'शेअरिंग'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - परवडणारे मीटर रिक्षाचे भाडे, बसची अपुरी संख्या अन् बसच्या मार्गावर नसणारे बहुतांश भाग अशा त्रांगड्यावर बुधवारी रिक्षाचालक अन् प्रवाशांनी एकमेकांची काळजी घेत तोडगा काढला. तासभर बसची प्रतीक्षा करणे आणि मीटर रिक्षाचा महागडा प्रवास करण्यापेक्षा शेअर रिक्षाला प्राधान्य देत प्रवाशांनी दोघांचीही अडचण दूर केली.

पोलिस आयुक्त आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या संयुक्त निर्णयामुळे मंगळवारपासून शहरात सीटर रिक्षावर बंदी घालण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी नियमाचे उल्लंघन करणाऱ्या २५० रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे बुधवारी दिवसभर रिक्षाचालकांनी नियमाचे काटेकोर पालन केले.

दुसरीकडे बसची संख्या कमी असल्याने सर्वसामान्य प्रवाशांची ससेहोलपट झाली. त्यातच मीटर रिक्षा परवडणारी असल्याने अनेकांना पायपीट करावी लागली, परंतु त्यात बराच वेळ जात असल्याने अनेकांनी संतापही व्यक्त केला.

दरम्यान, बसस्थानक ते रेल्वेस्टेशन, घाटी, विद्यापीठ, सिडको बसस्थानक ते जयभवानीनगर, क्रांती चौक ते पैठण गेट, शहागंज बाजार, अदालत रोड ते स्वामी विवेकानंद कॉलेज, निराला बाजार, जिल्हा परिषद अशा महत्त्वाच्या मार्गावर शहर बस तसेच शेअरिंग रिक्षाच्या किफायतशीर दरात प्रवासाची व्यवस्था नसल्याने विद्यार्थी, नागरिक पायीच मार्गस्थ झाल्याचे दिसून आले.

आज ५६ बसेस धावणार
शहरातीलविविध मार्गांवर बुधवारी ५६ बसेस धावल्या. त्यातून सुमारे लाख ७५ हजारांचे उत्पन्न मिळाले. गुरुवारीही तेवढ्याच बस सोडल्या जाणार आहेत, अशी माहिती सिडको बसस्थानकाचे आगारप्रमुख यू. ए. पठाण यांनी दिली.

१० दिवसांपासून थांबली पाच हजार रिक्षांची चाके
शहरात धावणाऱ्या साडेपाच हजार रिक्षांना मीटर नाहीत. या रिक्षाचालकांनी शहरातील १० एजन्सीकडे १५ दिवसांपूर्वीच नंबर लावला आहे. मात्र, एजन्सीधारकांनी मीटरच्या किमती वाढवल्या असून वाढीव रक्कम देणाऱ्यांना मीटर दिले जात आहेत. मात्र, त्यामुळे उर्वरित रिक्षाचालक त्रासून गेले असून सेंट्रल नाका, अंगुरीबाग, रेल्वेस्टेशन, एन ५, हडको, मिल कॉर्नर, कबाडीपुरा येथील एजन्सीसमोर रिक्षांची रांग लागत आहे.

तुम्हीच सांगा काय करायचे?
शिवाजीनगर भागातून चिकलठाणा येथे कामासाठी जाणाऱ्या मजुरांना मीटर रिक्षा प्रवासासाठी २०० रुपये द्यावे लागले. दिवसभर कष्ट केल्यानंतर त्याच्या हाती पडतात ते २०० रुपये प्रवासावरच खर्च झाले, तर त्याने जगायचे कसे? - डॉ. प्रा. संदीप गढेकर, प्रवासी

सातार परिसरासाठी बस सोडा
उड्डाणपूल होऊन दीड वर्ष उलटले तरी सातारा परिसर, लक्ष्मी कॉलनी, संग्रामनगर, ठाकरेनगर भागासाठी बसची सुविधा नाही. छत्रपती कॉलेजपर्यंत ये-जा करण्यासाठी बुधवारी १०० रुपये मोजावे लागले. या मार्गावर बस सोडणे आवश्यक आहे. - सदाशिव लोणे, नागरिक,लक्ष्मी कॉलनी सातारा परिसर

महिला प्रवासी जखमी
दरम्यान,बराच वेळ प्रतीक्षा केल्यानंतर बस येताच जागा पटकावण्याचा प्रयत्न करणारी एक महिला बसमधून पडून गंभीर जखमी झाली आहे. त्यांच्यावर माणिक हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत अाहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...