आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ससेहोलपट: पासपोर्टसाठी मुंबईला शहरवासीयांचे खेटे!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पासपोर्ट कार्यालय औरंगाबादमध्ये नसल्याने आणि ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर क्षुल्लक कारणांसाठी मुंबईला खेटे घालण्याची वेळ येत असल्याने औरंगाबादकर हैराण झाले आहेत. हे कार्यालय औरंगाबादेत सुरू करावे, अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान, मनपाने पासपोर्ट कार्यालयासाठी जागादेखील देऊ केली आहे. तथापि, कार्यालय सुरू करण्याचा निर्णय झालेला नाही.

औरंगाबाद हे औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्र असल्याने विदेशात जाणार्‍यांची संख्या मोठी आहे. उद्योग-व्यवसाय, उच्च शिक्षण, हज यात्रा आणि पर्यटन यासाठी विदेशात जाणार्‍यांची संख्या खूप मोठी आहे. मागील 15 वर्षांत विदेशात जाणार्‍यांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे.

लोकांना पडतात हेलपाटे
अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी विदेशात जाऊ इच्छिणार्‍या प्रशांतला तीन महिन्यांपासून पासपोर्टची प्रतीक्षा आहे. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर त्याला कागदपत्रांतील शंका दूर करण्यासाठी मुंबईला बोलावण्यात आले. तेथे जाऊन शंकानिरसन केल्यानंतर काही दिवसांनी वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र घेऊन या, असे सांगण्यात आले. अर्जासोबत जोडावयाच्या कागदपत्रांत तसा कोणताच उल्लेख नसल्याने त्याने ते प्रमाणपत्र जोडले नव्हते. पण तेवढय़ासाठी पुन्हा मुंबईला जावे लागले. प्रमाणपत्र देऊन महिना लोटला, त्याचा पोलिस तपासणी अहवाल अद्याप बाकी आहे. ते झाल्यावर त्याला पासपोर्ट मिळेल. हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. पण किरकोळ दुरुस्त्यांसाठी मुंबईला चकरा माराव्या लागत आहेत.

पोलिस आयुक्तालयावर भार
2002 मध्ये पासपोर्ट कार्यालय बंद झाल्यानंतर पोलिस आयुक्तालयात पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यात आले. तेथेही थोड्याफार फरकाने याच प्रकारची व्यवस्था होती. मात्र येथे पोलिसांना या कामात जुंपले होते.

कार्यालयाचा प्रस्ताव पडून
खैरे म्हणाले, कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव परराष्ट्र मंत्रालयाकडे पडून आहे. त्यावर निर्णय झाल्यास ते लगेच सुरूहोईल. या संदर्भात परराष्ट्र खात्याच्या सचिवांची चार वेळा भेट घेतली आहे. परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनाही निवेदन दिले आहे.

शहरात कार्यालय होणे आवश्यक
आता फक्त पडताळणीचे काम असल्याने ताण कमी आहे. पण एकूण परिस्थिती पाहता पासपोर्टसाठी अर्ज करणार्‍यांची संख्या खूप वाढली आहे. त्यामुळे येथे पासपोर्ट कार्यालय व्हायला हवे, असे पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.

2002 पर्यंत होती चांगली पद्धत
औरंगाबादमध्ये पासपोर्ट कार्यालय असताना कागदपत्रांची फाइल सादर केली की येथेच तपासणी होऊन पोलिस तपासणी अहवालानंतर ही फाइल मुंबई कार्यालयात पाठवली जायची. त्यानंतर तेथून पासपोर्ट वितरित केला जायचा. औरंगाबादचे कार्यालय बंद (2002) होईपर्यंत असे कामकाज चालायचे.

आता सगळे ऑनलाइन
2012 मध्ये मे महिन्यापासून पासपोर्ट अर्जांचा ऑनलाइन भरणा सुरू झाला. यामुळे आता पोलिस आयुक्त कार्यालयात फक्त पडताळणीचे काम राहिले आहे. मात्र, ऑनलाइन पद्धतीमुळे नागरिकांची मात्र ससेहोलपट होत आहे. 2012 मध्ये अवघे 425 अर्ज ऑनलाइन भरले गेले.

मनपाने जागाही ठरवली
विद्यानगरातील मनपाच्या मालकीच्या गाळय़ांपैकी काही गाळे या कार्यालयाला देण्याचे मनपाने ठरवले आहे. मंत्रालयाने मंजुरी दिली तर कार्यालय सुरू होण्यात कशाचीच अडचण येणार नाही.
-चंद्रकांत खैरे, खासदार आणि अध्यक्ष, पारपत्र समिती