आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीच्या अटापिटा पतंगरावांचा फाटा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-शरद पवारांची वेळ मिळाली नाही तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण झाल्यानंतरच संग्रामनगर पुलावरून मोटारी धावतील यासाठी दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा आटापिटा सुरू होता. सोमवारी शिवसेनेने पुलावरून वाहन रॅली काढल्यानंतर पोलिसांनी लगेचच बॅरिकेड्स लावून पूल बंद केला होता. मात्र पतंगराव कदम यांनी राष्ट्रवादीच्या आट्यापिट्यावर पाणी फेरले. पवार यांच्या हस्ते फीत कापण्यापूर्वीच वनमंत्री पतंगराव कदम यांच्या मोटारींचा ताफा पुलावरून गेला.
मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता पवार यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा होणार होता. मात्र ते 10 मिनिटे उशिरा आले. त्यापूर्वीच 7 वाजून 4 मिनिटांनी विरुद्ध दिशेने कदम यांच्या मोटारींचा ताफा आला. लावण्यात आलेली फीत पोलिसांनी उंच केली आणि त्याखालून ताफा रवाना झाला. कदम लोकार्पण सोहळ्यासाठी थांबले नाहीत. कदम गेल्यानंतर चारच मिनिटांनी पवार आले आणि त्यांनी फीत कापली आणि गेल्या दोन वर्षांपासून वाहतुकीच्या कोंडीमुळे त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला. या वेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री जयदत्त क्षीरसागर, शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे, आमदार डॉ. कल्याण काळे, विक्रम काळे, एम. एम. शेख उपस्थित होते.
संग्रामनगर उड्डाणपुलाचे औपचारिक लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मंगळवारी संध्याकाळी झाले. त्यानंतर दिव्यांच्या लखलखाटात वाहनचालकांनी पुलावरून वाहने दामटण्यास सुरुवात केली. छाया : मनोज पराती
बघ्यांच्या गर्दीने वाहतूक अडली
लोकार्पण सोहळा सुरू होण्यापूर्वीच स्थानिक नागरिकांनी येथे मोठी गर्दी केली होती. आजूबाजूच्या इमारतींवरही नागरिक थांबले होते. बघ्यांनी पुलावरून सफर केल्यामुळे लोकार्पण सोहळ्यानंतर या पुलावरील वाहतूक खोळंबली. लाल दिव्याच्या मोटारीही अडकल्या होत्या. त्यातच मंत्र्यांची संख्याही जास्त असल्यामुळे वेळोवेळी पोलिस वाहतूक थांबवत होते. त्याचाही फटका बसला. पोलिसांनी लाठय़ा चालवण्याची भाषा केल्यानंतरही साडेआठ वाजेपर्यंत या पुलावरील वाहतूक ठप्पच होती.