औरंगाबाद । लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे कार्यकर्ते सैरभैर झाले हे खरे असले तरी त्यावर नेतृत्व बदल हा उतारा होऊ शकत नाही. दोन महिन्यांत आता काहीही फरक पडणार नाही. काँग्रेस कार्यकर्त्यांत आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज आहे, असा ज्येष्ठतेचा सल्ला राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिला.
1977 च्या पराभवानंतर इंदिरा गांधी कराड येथे आल्या होत्या, तेव्हा त्यांच्यासोबत फक्त पाचच कार्यकर्ते होते, पुढे त्या पुन्हा सत्तेत आल्या. राजकारणात परिस्थिती बदलत राहते, सेटबॅक बसलाय, त्यातून धडा घेण्याची तेवढी गरज आहे, काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास राज्याचे ज्येष्ठ मंत्री पतंगराव कदम यांनी व्यक्त केला. टंचाईच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मराठवाड्यातील अधिका-यांची बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, विधानसभेच्या निवडणुका दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. अशा परिस्थितीत बदलाचा परिणाम होणार नाही. अशोकराव नेतेच : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे राज्याचे नेते असून प्रचाराची धुरा त्यांच्याकडे राहील, असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला. मात्र, हा निर्णय दिल्लीश्वरच घेतील, हेही पुन्हा स्पष्ट केले.
मला घाई नाही
तुमचे काय चाललेय, या प्रश्नावर येत्या दोन महिन्यांसाठी मला कसलीही घाई नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. नेतृत्व कोणाकडे द्यायचे यावर आमच्या पक्षात एकाच ओळीचा ठराव होतो तो म्हणजे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार श्रेष्ठींना दिले जातात. त्यामुळे येथे कधी काय होईल, कोण मंत्री होईल, कोण घरी जाईल हे सांगता येत नाही. तरीही मला मात्र दोन महिन्यांसाठी कोणतीही घाई करायची नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.