आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनाला पटेल ते काम प्रामाणिकपणे करा- सुनील केंद्रेकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-आयुष्यात मनाला पटेल ते काम करा. प्रामाणिक प्रयत्न केल्याने कुठल्याही कामात यश नक्कीच मिळते. विद्यार्थिदशेतच आपले ध्येय काय आहे, हे लक्षात घेऊन त्या दिशेने प्रयत्न सुरू ठेवणे आवश्यक आहेत, असा सल्ला सिडकोचे मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर यांनी विद्यार्थ्यांना दिला. शनिवारी (1 फेब्रुवारी) जेएनईसी महाविद्यालयात आयोजित ‘रोबोट्रिस्ट’ या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
असा झालो एमपीएससी : या वेळी केंद्रेकरांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. काही काळ त्यांनी जेएनईसी महाविद्यालयात अध्यापनाचे कामही केले होते. ते म्हणाले, मित्रांनी सांगितले म्हणून स्पर्धा परीक्षांकडे वळलो होतो. त्यांनीच माझा फॉर्म भरला. मी परीक्षा दिली. ज्या वेळी परीक्षेचा निकाल होता तेव्हा मी सिनेमा पाहण्यासाठी मित्रांना आग्रह करत होतो. जिल्हाधिकारी कार्यालयात निकाल पाहण्यासाठी गेलो होतो. त्यात मी टॉपर होतो. या क्षेत्रात काम करताना अनेक चांगले-वाईट अनुभव आले, असा उल्लेखही केंद्रेकरांनी केला.जेएनईसी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागाच्या विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. दोन फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष कॉड कॉप्टर तयार करण्यात येणार आहे.
या वेळी विभागप्रमुख डॉ. एस. एस. कदम, एमजीएमच्या संचालिका अपर्णा कक्कड यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य सुधीर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा घेण्यात येत आहे. अभिषेक गौर, गौरी मांडवेकर, अजिंक्य पाथ्रीकर, अर्जुन वानखेडे, व्यंकटेश साळुंके, चेतना पाटील, सुचिता देशमुख, नेहा डेंगाळे, शिवानी यादव, प्रेरणा आहेर आदी विद्यार्थी या कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी प्रयत्न करीत आहेत.
विद्यार्थी बनवणार कॉड कॉप्टर
कार्यशाळेत विद्यार्थ्यांना ‘कॉड कॉप्टर’ शिकवले जाणार आहे. ‘थ्री इडियट्स’ सिनेमात आमिर खान ज्याप्रमाणे छोटे हेलिकॉप्टर तयार करतो, तसे हेलिकॉप्टर बनवण्याचे तंत्र विद्यार्थ्यांना शिकवले जाणार आहे. कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना याविषयी प्राथमिक माहिती देण्यात आली. दिल्ली आयआयटीमधील प्राध्यापक जेकब रोबलो, आदर्श रवींद्रा हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.