आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलाचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांची डॉक्टरांना मारहाण, डॉक्टरांनी जाहिर केला एक दिवसाचा संप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - घाटी रुग्णालयात शनिवारी पहाटे ५.३० वाजता १४ दिवसांच्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाइकांनी निवासी डॉक्टरला शिवीगाळ मारहाण केली. यानंतर १० ते १२ निवासी डॉक्टरांनी प्रतिहल्ला केला. यात रुग्णाचे आई-वडील दोघे जखमी झाले. प्रशासनाला वेठीस धरत २७० डॉक्टरांनी निषेध म्हणून शनिवारी एक दिवसाचा संप केला. दरम्यान रात्री साडेआठ वाजता १८ मधील ब्रदर प्रदीप माने त्यांच्या पत्नीस अपघात विभागासमोर अज्ञात लोकांनी मारहाण केली.
जालना येथील शेख रौनक आणि सुमैय्या शेख यांना १२ मे रोजी मुलगा झाला. जन्मानंतर अवघ्या तीन दिवसांतच त्याच्यावर जालना येथील मिशन रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर बाळाची प्रकृती चिंताजनक होती. पाच दिवसांपूर्वी त्या बाळाला घाटीत दाखल करण्यात आले. शनिवारी पहाटे ५. ३० वाजता या बाळाचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या दिरंगाईमुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत शेख रौनक यांनी निवासी डॉक्टर राकेश चिकलोंडे यांना मारहाण केली. एका १४ वर्षाच्या मुलाने शिवीगाळ केल्याने डॉक्टर राकेश यांच्यासह इतर निवासी डॉक्टरांनी प्रतिहल्ला केला. यामध्ये रौनक त्यांच्या पत्नी सोमय्या किरकोळ जखमी झाल्या.


रुग्ण सेवेवर परिणाम नाही
याघटनेमुळे घाटीत प्रचंड तणाव निर्माण झाला. सर्व निवासी डॉक्टरांनी घटनेचा निषेध करत काम बंद केले. तातडीच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मात्र, इतर शस्त्रक्रीया पुढे ढकलण्यात आल्या. रविवारी सकाळी सर्व डॉक्टर कामावर परततील. रुग्णसेवेमध्ये यामुळे खंड पडला नाही.
धुमश्चक्री सुरू असताना आम्ही तेथेच होतो. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा रक्षकाला बोलवत असताना हल्लेखोरांनी तेथून पळ काढला.
डॉ. सुहास जेवळीकर, अधीक्षक.

रुग्णसेवेचा संपूर्ण भार निवासी डॉक्टरांच्या खांद्यावर आहे. आम्ही संपूर्ण सर्मपणाने सेवा देतो. मात्र, रुग्ण दगावताच आम्हालाच मारहाण होते. चोवीस तास काम करुनही हे आमच्या पदरी येते. वारंवार असे प्रकार घडतात. यासाठी आम्ही मार्डच्यावतीने काही मागण्यांचे निवेदन दिले आहे. सात दिवसांत ते पूर्ण केल्यास बेमुदत संपाचा इशारा दिला आहे.
डॉ.ऋषिकेश चेवले, अध्यक्षमार्ड.

गर्भात कमी दिवस राहिल्याने बाळाची प्रकृती चिंताजनक होती. बाळाच्या मृत्यूनंतर मला मारहाण झाली. यानंतर आम्ही अधिष्ठाता, अधीक्षक यांना कळवले. मात्र, त्यांच्यासमोरही नातेवाइकातील एका मुलाने शिवीगाळ केली, तेव्हा संयम सुटला.
डॉ. राकेश चिकलोंडे, निवासीडॉक्टर.

मारहाणीचे कळाल्यावर मी अधीक्षक डॉ. सुहास जेवळीकर घाटीत आलो. आमच्यासमोरही नातेवाइकांनी हात उगारला. त्यानंतर डॉक्टरांचा संयम सुटला, त्यांनी प्रतिहल्ला केला. रौनक यांच्यावर त्यांनी हल्ला केला, तो वाचवताना त्यांच्या पत्नी सोमय्या मध्ये आल्याने त्यांनाही मारहाण झाली.
डॉ. के. यू. झिने, प्रभारी अधिष्ठाता.

संप पुकारल्यानंतर घाटीतील निवासी डॉक्टरांनी प्रभारी अधिष्ठाता डॉ. के.यू. झिने, अधीक्षक सुहास जेवळीकर यांच्याशी चर्चा केली. दुसऱ्या छायाचित्रात डॉक्टरांच्या मारहाणीत बेशुद्ध पडलेले रौनक शेख.
काय आहेत मागण्या
{ रुग्णांसोबत दोन पेक्षा अधिक नातेवाइक राहता कामा नये
{ प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे हवेत
{ रजिस्ट्रेशन काउंटर आप्तकालीन विभागाबाहेर हलवा
{ सुरक्षा रक्षक कंपनी बदला
{ सीएमओंची संख्या वाढवा

छाया : रवी खंडाळकर.
बातम्या आणखी आहेत...