आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नसलेल्या आजारावर उपचारांची शिक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जो आजारच नव्हता त्यावरील उपचार चुकीच्या रिपोर्टमुळे करण्यात आल्याचा भलताच प्रकार समोर आला आहे. संधिवाताच्या लक्षणांमुळे संधिवाताची तपासणी करण्यात आली आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह आला म्हणून एका डॉक्टरने संधिवाताचे उपचार केले. त्रास कमी होण्याऐवजी अजूनच वाढला आणि शेवटी त्रास असह्य झाल्यामुळे रुग्णाने दुसर्‍या डॉक्टरकडे धाव घेतली. तिथे तीच तपासणी आणि त्यापुढील अजून एक महत्त्वपूर्ण तपासणी मात्र निगेटिव्ह आली. विशेष म्हणजे व्हिटॅमिन डी व व्हिटॅमिन बी-12 च्या लक्षणीय कमतरतेमुळेच हा त्रास सुरू झाल्याचे निष्पन्न झाले, ज्याची केवळ लक्षणे संधिवातासारखी होती.

सुदैवाने ही व्हिटॅमिनची कमतरता असल्याचे निदान उशिरा का होईना झाल्यानंतर ‘लाइन ऑफ ट्रिटमेंट’ बदलली आणि योग्य उपचारांमुळे संबंधित रुग्णाचा पाच-सहा महिन्यांपासून होणार त्रास पूर्णपणे थांबला. मात्र, या सगळ्या तपासणी-उपचारांतल्या गोंधळात रुग्णाला मोठय़ा प्रमाणात शारीरिक, मानसिक, आर्थिक झटके सहन करावे लागले. शिवाय प्रकृतीचे ताळतंत्रच बिघडल्यामुळे ‘ओमान’मध्ये नोकरीसाठी असलेल्या रुग्णाला शहरातच दोन महिने तळ ठोकून राहावे लागले, त्यामुळे झालेले नुकसान वेगळेच. याप्रकरणी ग्राहक मंचमध्ये तक्रार दाखल झाली असून, मंचने जिंदानी पॅथॉलॉजी लॅबोरेटरीला नोटीस बजावली आहे.

मूळचे शहरातील; परंतु नऊ वर्षांपासून दुबई, लिबिया, ओमानमध्ये असलेले अजय पांडुरंग देवकर (42) यांना पाच-सहा महिन्यांपासून बोटे दुखणे, गुडघे दुखणे, अंगदुखीसारखा त्रास होत होता. ओमानमध्ये समाधानकारक उपचार झाले नाहीत म्हणून त्यांनी शहरातील देवरे अँक्सिडेंट हॉस्पिटलकडे धाव घेतली. डॉ. सारंग देवरे यांनी 13 सप्टेंबर रोजी वेदनाशामक औषधे देऊन संधिवाताच्या लक्षणांवरून ‘आर. ए. फॅक्टर’ ही तपासणी करण्यास सांगितली. देवकर यांनी शहरातील जिंदानी पॅथॉलॉजी लॅबोरेटरीमध्ये 14 सप्टेंबर रोजी तपासणी केली आणि तिथे पॉझिटिव्ह रिपोर्ट आला. या पॉझिटिव्ह रिपोर्टच्या आधारे डॉ. देवरे यांनी 14 सप्टेंबर रोजी संधिवाताची औषधे दिली. औषधांनी त्रास कमी होण्याऐवजी वाढतच गेला. त्रास असह्य झाल्यानंतर त्यांनी डॉ. हेडगेवार रुग्णालयातील र्‍ह्युमॅटॉलॉजिस्ट डॉ. अविनाश बुचे यांचे उपचार घेतले. रुग्णालयाच्या पॅथॉलॉजी लॅबमध्ये ‘आर. ए. फॅक्टर’सह अधिक अचूक समजण्यात येणारी व जगभर मान्यताप्राप्त असणारी ‘अँटी सीसीपी’ ही तपासणीही निगेटिव्ह आली. इतर अनेक तपासण्यांचे रिपोर्ट सामान्य आले, खात्रीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या पॅथॉलॉजी लॅबमध्ये केलेल्या तपासणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला; परंतु जिंदानी लॅबमध्ये दुसर्‍यांदा रुग्णासमोर केलेल्या याच तपासणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, हे विशेष!

लक्षणे संधिवातासारखीच
व्हिटॅमिन ‘डी’च्या कमतरतेमुळे हाडांचे-स्नायूंचे दुखणे निर्माण होऊ शकते किंवा ‘बी-12’च्या कमतरतेमुळेही अँनेमिया, अंगदुखी, तोल सांभाळता न येणे, मेंदूचे आजार होणे, असे विविध त्रास उद्भवू शकतात, ज्याची लक्षणे संधिवातासारखी वाटू शकतात. मात्र, हा संधिवात नाही. यालाच ‘हायपो व्हिटॅमिनोसिस’ असे म्हणतात. सूर्यप्रकाश न मिळणे, सातत्याने रात्रपाळ्यांमध्ये काम करणे, शाकाहारी असणे आदी कारणांमुळे या व्हिटॅमिनची कमतरता निर्माण होऊ शकते. ‘आर. ए. फॅक्टर’ या चाचणीत 20 टक्के रुग्णांमध्ये चुकीचा निष्कर्ष (फॉल्स पॉझिटिव्ह) येऊ शकतो, तर ‘अँटी सीसीपी’ या चाचणीत 95 टक्क्यांपर्यंत अचूकता असते. डॉ. अविनाश बुचे, र्‍ह्युमॅटॉलॉजिस्ट.


‘किट’मुळे चुकू शकतो रिपोर्ट
कुठल्याही आजाराच्या योग्य निदानासाठी चाचण्या या केवळ साह्यभूत ठरत असतात. ‘आर. ए. फॅक्टर’पेक्षा ‘अँटी सीसीपी’ ही चाचणी अधिक अचूक असली तरी केवळ त्यावरून निदान करता येत नाही. संपूर्ण रुग्णाचा त्रास, पार्श्वभूमी, प्रकृती यांचा विचार करून आणि चाचण्यांचा आधार घेऊन निदान करणे आवश्यक आहे. अर्थात, लॅबमधील ‘किट’ योग्य नसेल तर चुकीचा रिपोर्ट येऊ शकतो. डॉ. राजन बिंदू, घाटी.

अँटी सीसीपी’चा रिझल्ट 99%
‘अँटी सीसीपी’ चाचणीमध्ये 99 टक्क्यांपर्यंत अचूकता मिळते आणि या चाचणीला जगभरात मान्यता आहे. ही चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे संबंधित रुग्णाला संधिवात नाही, हे खात्रीने सांगता येऊ शकते. डॉ. शिल्पा वैष्णव, पॅथॉलॉजिस्ट.

रिपोर्टमुळे संधिवाताची औषधे
‘आर. ए. फॅक्टर’चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळेच देवकर यांना संधिवाताची औषधी सुरू केली. शेवटी चाचण्या असतात कशासाठी? हा रिपोर्ट निगेटिव्ह आला असता, तर ही औषधी दिली नसती. डॉ. सारंग देवरे, अस्थिरोगतज्ज्ञ.

ग्राहकमंचात सांगू
याप्रकरणी प्रतिक्रिया देणार नाही. ग्राहक मंचमध्ये अधिकृत म्हणणे सादर केले जाईल. डॉ. नितेश जिंदानी, जिंदानी पॅथॉलॉजी लॅबोरेटरी.