आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘पे अँड पार्क’ योजना मंजूर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मनपा आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी रस्त्यावरील ‘पे अँड पार्क’ योजनेचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या विरोधात सूर आळवणार्‍या स्थायी समिती सदस्य आणि अध्यक्षांनी एकमुखाने या योजनेला पाठिंबा दिला. सिडको एन-6 येथील स्मशानभूमीलगतचा रस्ता या योजनेतून वगळण्याचे सुचवून या योजनेवर स्थायी समितीने शिक्कामोर्तब केले.

चार दिवसांपासून शहरातील दहा ठिकाणी आयुक्तांनी ही योजना हाती घेतली होती. पालिकेच्या जागेवर वाहनतळ उभारून तेथे शुल्क आकारावे, मात्र भर रस्त्यावर असे शुल्क आकारू दिले जाणार नाही, अशी भूमिका काही सदस्यांनी घेतली होती. त्याचबरोबर आयुक्तांनी हा निर्णय घेताना स्थायी किंवा सर्वसाधारण सभा यापैकी एकाही सभागृहाची मान्यता न घेतल्यामुळे योजनेला विरोध केला जाईल, असे संकेत दिले होते. ‘पे अँड पार्क’ योजनेच्या मान्यतेसाठी डॉ. भापकर यांनी आज स्थायी समितीसमोर प्रशासकीय प्रस्ताव ठेवला होता. याला कडाडून विरोध होईल असे संकेत काल मिळाले होते. मात्र स्मशानभूमीच्या ठिकाणी शुल्क आकारण्याचे रद्द करून हा प्रस्ताव सभागृहाने जसाच्या तसा मान्य केला.

दवाखाने, क्लासेसना परवानगी आहे का? : शहरातील खासगी दवाखाने, कोचिंग क्लासेस येथे वाहने उभी करण्यासाठी शुल्क आकारले जाते. महापालिका अधिनियमात याबाबत काही तरतूद आहे का, याची विचारणा सभागृहाने केली. पुढील बैठकीत त्याबाबत प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येणार आहे. भाजपचे बालाजी मुंडे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. बांधकाम परवानगी घेताना दाखवण्यात आलेल्या वाहनतळाच्या जागेवर वाहने उभी केल्यास शुल्क आकारता येते का, असा त्यांचा प्रश्न होता.