आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्दी जमवण्यासाठी साहित्य, पुरस्कार सोहळ्यांचा वापर, सवंगपणा अन् जाहिरातबाजीमुळेच मराठी भाषा दीन-कविता महाजन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मराठी दिनाचे औचित्य साधून शासनातर्फे प्रकाशन, पुरस्कार सोहळे आयोजित केले जातात. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जाहिरातही केली जाते, परंतु ज्यांनी त्या साहित्यासाठी आयुष्य दिलं त्यांचे नावही त्या जाहिरातीत दिसत नाही. सरकारच्या वागण्यातून उथळपणा, पोरकेपणा दिसून येतो. एवढेच नव्हे तर साहित्य, पुरस्कारांचा वापर गर्दी गोळा करण्यापुरताच होत आहे, असे सडेतोड बोल कवयित्री कविता महाजन यांनी सुनावले. 
 
मराठवाडा साहित्य परिषदेच्या डॉ. ना. गो. नांदापूरकर सभागृहात सोमवारी कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा कविता दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त मसापतर्फे कविसंमेलन आणि काव्य पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते या वेळी त्या बोलत होत्या.
 
या सोहळ्यात यंदाचा कवयित्री लीला धनपलवार काव्य पुरस्कार कविता महाजन यांना, तर कविवर्य कुसुमाग्रज काव्य पुरस्कार सतीश काळसेकर यांना प्रसिद्ध समीक्षक डॉ. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, प्रा. श्रीधर नांदेडकर, दिनकर मनवर, दादा गोरे यांची उपस्थिती होती. 
 
जगण्यातीलविरोधाभासामुळे लेखनात भंपकपणा : स्वत:च्यालेखनप्रवासाबाबत महाजन म्हणाल्या, विरह, विद्रोह हे माझ्या लेखनाचे विषय बनले. सोशल मीडियामुळे अनेक जण व्यक्त होत आहेत. या माध्यमामुळे निरनिराळ्या स्तरांतील घटकांचा संवाद वाढला असून त्यातून कविता समृद्ध होईल. समृद्ध होणं खरं तर स्वत:वर अवलंबून असतं.
 
जगण्यातील विरोधाभासामुळे लेखनात भंपकपणा दिसतो. त्यामुळे सुमार लेखन करणाऱ्यांची संख्या वाढते तेव्हा राजकारणी असेच उपकार केल्यासारखे वागणारच. त्यांचे ऐकून घ्यावे लागणे ही शरमेची बाब आहे. ही वृत्ती बदलली तरच आमची कविता कारणी लागेल. हा पुरस्कार वडिलांना अर्पण करते. ज्यांच्या नावाने हा पुरस्कार मिळाला त्या धनपलवारांनी मला शिकवले याचा आनंद असल्याचेही त्या म्हणाल्या.
 
 काळसेकर म्हणाले, कवीसाठी “सुखी सदरे’ उपलब्ध नसतात. आज मोठ्या प्रमाणात लोक व्यक्त होताना दिसतात. मराठीसाठी ही चांगली बाब आहे, कवितेसाठी आशादायी चित्र आहे. डॉ. पाटील यांनी आज साहित्यात निर्माण झालेल्या जातीपाती आणि गटातटांवर खंत व्यक्त केली. प्रा. नांदेडकर यांनी काळसेकर आणि महाजन यांच्या काव्यलेखनावर भाष्य केले. प्रास्ताविक ठाले पाटील यांनी केले. सूत्रसंचालन आभार प्रदर्शन दादा गोरे यांनी केले. 
 
बातम्या आणखी आहेत...