आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • People Loc Amc Officers On Water Issue Aurangabad

पाण्यासाठी अधिकार्‍यांना कोंडले, कार्यकर्त्यांवर दंगलीचा गुन्हा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याच्या कारणावरून मंगळवारी सकाळी भाजप कार्यकर्त्यांनी सिटी वॉटर युटिलिटी प्रा. लि. कंपनीच्या अधिकार्‍यांना त्यांच्या दालनात कोंडले. एन-७ येथील जलकुंभाच्या आवारात हा प्रकार घडला. कंपनीचे मेंटेनन्स हेड वीरभद्र अप्पा शिवनगे यांच्या फिर्यादीवरून भाजपच्या कार्यकर्त्यांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दुपारी त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. पाण्यासाठी आंदोलन करणार्‍यांवर गुन्हा दाखल झाल्याने अधिकारी बदलताच सिटी वॉटर युटिलिटी कंपनीचे धोरणही बदलल्याचे दिसून येत आहे. यापूर्वीचे उपाध्यक्ष गौरीशंकर बसू यांना मारहाण होऊनही त्यांनी पोलिसांत तक्रार दिली नव्हती. मात्र, बसूंनी ही कंपनी सोडल्यानंतर कंपनीचे धोरणही बदलले आहे.

सहा महिन्यांपासून एन-७ भागासह इतर परिसरात पाणीपुरवठा विस्कळीत आहे. काही भागांत पाण्याची दुर्गंधी येत आहे. याबाबत सिडकोतील नागरिकांनी महापालिका आणि सिटी वॉटर युटिलिटीच्या अधिकार्‍यांकडे अनेकदा तक्रार केली. मात्र, काहीही फरक पडल्यामुळे मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास नागरिक आणि भाजपचे कार्यकर्ते एन-७ येथील जलकुंभावर पोहोचले. तेथील अधिकारी कर्मचार्‍यांना जाब विचारण्यास सुरुवात केली. बोलण्याचे रूपांतर वादात झाले आणि संतप्त कार्यकर्ते, नागरिकांनी सिटी वॉटर युटिलिटीचे मेंटेनन्स हेड व्ही. बी. शिवनगे, सोहम खुराणा, महेश दुसे आणि पालिकेचे उपअंभियता अशोक पद्मे यांना त्यांच्याच दालनात डांबून ठेवले.

अधिकार्‍यांना कोंडून घोषणाबाजी : कार्यकर्ते नागरिकांनी अधिकार्‍यांना त्यांच्या दालनात कोंडल्यानंतर या दालनासमेार उभे राहून समांतरच्या विरोधात घोषणा दिल्या. या वेळी शिवाजी दांडगे, गणेश नावंदर, माजी नगरसेविका रेखा पाटील, सतीश खेडकर, राहुल खरात, नगरसेविका सुरेखा खरात, नगरसेवक नितीन चित्ते, प्रदीप ठाकरे आदींचा समावेश होता. सकाळी साडेसहा वाजेपासून आलेल्या नागरिकांनी शहर अभियंता सखाराम पानझडे यांना जलकुंभावर येण्यासाठी फोन केला. जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी येत नाहीत, तोपर्यंत कुलूप काढणार नाही, अशी भूमिका संतप्त नागरिकांनी घेतली. साडेअकरा वाजेच्या सुमारास कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे आले; परंतु त्यांनी नागरिकांशी संवाद साधला नाही. बाराच्या सुमारास उपमहापौर प्रमोद राठोड आल्यानंतर त्यांनी समांतरच्या अधिकार्‍यांना खडसावले आणि प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला.

यांना अटक सुटका : गौतमभगवान खरात (३३ ), रवींद्र तेजराव जाधव (३७,) सुधीर रावसाहेब मोकळे (२५), सतीश शिवाजी खेडकर (२५), राहुल भगवान खरात (२९), गणेश रामजीवन नावंदर (४२) अशी अटक नंतर सुटका झालेल्या आरोपींची नावे आहेत.

प्रयत्न सुरू आहेत
फारोळ्यामधून पाणीपुरवठा उशिराने झाल्यामुळे जलकुंभ भरले नाहीत. सकाळी उशिराने जलकुंभावरून पाणीपुरवठा सुरू केला. येत्या दोन ते तीन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत होईल. अशोक पद्मे, उप अभियंता,मनपा पाणीपुरवठा

कोणते तरी एक काम करावे
शहरात सगळीकडे पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. समांतर योजनेच्या अधिकार्‍यांनी कोणते तरी एक काम करावे. मीटर बसवा किंवा पाणीपुरवठा सुरळीत करण्याकडे लक्ष दिले पाहिजे, तरच नागरिकांना सुरळीतपणे पाणीपुरवठा होईल. प्रमोद राठोड, उपमहापौर

धोरण आक्रमक
सिटी वॉटर युटिलिटीच्या बिझनेस विभागाचे तत्कालीन उपाध्यक्ष गौरीशंकर बसू यांना रमानगर भागात पाणीप्रश्नावरून मारहाणही झाली होती. याशिवाय कंपनीच्या अनेक कर्मचार्‍यांनाही नागरिकांनी मारहाण केली होती. मात्र, बसू यांनी संयमाने घेत पोलिसांत जाणे टाळले होते. बसू यांनी आता ही कंपनीच सोडली आहे. त्यांच्या जागेवर काही दिवसांपूर्वी सोनल खुराणा रुजू झाले आहेत. त्यामुळे खुराणा यांनी आक्रमक धोरणाला सुरुवात केली आहे.

धिंड काढण्याची धमकी
कार्यकर्त्यांनी वॉटर युटिलिटीच्या अधिकार्‍यांना शिव्या देत नग्न करून धिंड काढू, अशी धमकी दिल्याचे शिवनगे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. प्रकरण हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिस निरीक्षक राजकुमार डोंगरे यांनी सहा व्यक्तींना तत्काळ अटक केली त्यांच्यावर कलम १४३ नुसार दंगलीचा गुन्हा दाखल केला. याशिवाय ३२३, ५०७, ३५३ आदी कलमान्वयेदेखील गुन्हा दाखल केला. दुपारपर्यंत या सगळ्यांना जामीन मिळाला. पुढील तपास फौजदार हरीश खटावकर करत आहेत.