औरंगाबाद: ऐतिहासिक शहर अशी ओळख असलेल्या शहरातील रस्ते खराब असल्याने शहराची प्रतिमा मलीन होत आहे. ती सुधारण्यासाठी शहरात २६२ कोटी रुपयांचे रस्ते तयार करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. यातून यंदा कमीत कमी पन्नास ते शंभर कोटी रुपये शासनाकडून मिळण्याची शक्यता असून यातून प्राधान्याने ऐतिहासिक स्थळांना जोडणारे गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार रस्ते तयार केले जातील, अशी ग्वाही मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी नागरिकांना दिली.
स्मार्ट सिटीतील विकासकामांत नागरिकांचा समावेश असणेही आवश्यक आहे. यासाठी त्यांच्या सूचना महत्त्वाच्या असल्याने शहरातील सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, वकील, डॉक्टर, आर्किटेक्ट, एनजीओ आणि इतर संस्था व्यक्तींचा सहभाग वाढवण्यासाठी बुधवारी महापालिका आणि औरंगाबाद सिटिझन फोरमच्या वतीने मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्रात दुपारी चार वाजता विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीला दोनशेपेक्षा जास्त नागरिकांची उपस्थिती होती. यात ५० पेक्षा जास्त नागरिकांनी लक्षवेधी सूचना मांडल्या.
आधीरस्ते बनवणार : बैठकीतआरोग्यासह ग्रीन सिटीबाबत सर्वाधिक मते व्यक्त करण्यात आली. मनपाकडून घनकचरा व्यवस्थापन महत्त्वाचे मसिआचे विजय लेकुरवाळे म्हणाले की, वाळूज महानगरात २५० हेक्टरवर प्रभाग करून एका प्रभागात दहा जणांवर स्वच्छतेची जबाबदारी दिली. त्यामुळे चांगली स्वच्छता झाली. तशीच यंत्रणा शहरात व्हावी . नगरसेवक शिवाजी दांडगे यांनीही स्वच्छतेसाठी लोकसहभागाला महत्त्व दिले.
स्मार्ट आरोग्यही महत्त्वाचे
डॉ. मंजूषा शेरकर यांनी सांगितले की, स्मार्ट शहरासह स्मार्ट आरोग्यही महत्त्वाचे आहे. मुलांना मैदानी खेळ, आरोग्य शिक्षण महत्त्वाचे असून टीव्ही, मोबाइलपासून दूर ठेवणे गरजेचे. त्यानंतर डॉ. श्रीकांत पानसे, डॉ. रोपळेकर यांनीही सूचना केल्या.
शहरात चार टक्केही ग्रीन झोन नाही
ग्रीनसिटीबाबत मत मांडताना डॉ. किशोर पाठक यांनी सांगितले की, शहरात चार टक्केही हरित पट्टे नाहीत. सध्या शहरात चार ऑक्सिजन हब असून ते कमी आहेत. पुण्यात ४८ लाख वृक्ष असून आपल्या शहरात मात्र सव्वातीन लाख वृक्ष असल्याचे सांगितले. पर्यावरणशास्त्राच्या अभ्यासक मेघना बडजाते यांनी शहरात वृक्ष गणना करण्याची मागणी केली. मोकळ्या भूखंडावर वृक्षारोपण करा, वृक्षोद्यान तयार करा, आम्ही मदत करण्यास तयार आहोत, असेही बडजाते म्हणाल्या. तसेच सीएसआरचा निधी वृक्ष लागवडीसाठी वापरण्याची सूचना करून टेरेस गार्डनला टॅक्समधून सूट देण्याची मागणी त्यांनी केली.
राजकारण्यांना बैठकी पासून दूर ठेवले
याबैठकीला केवळ शहरातील विविध घटकांना निमंत्रित केले होते. कुठल्याही राजकीय व्यक्तीला हेतुपुरस्सर निमंत्रण दिले नाही. ही मंडळी असती तर चर्चेचा सूर बदलतो त्यामुळे सर्वसामान्य, तज्ज्ञ व्यक्तींच्या सूचनाही तितक्याच महत्त्वाच्या असल्याने या व्यासपीठावर त्यांना प्राधान्य दिले, असे महावीर पाटणी यांनी सांगितले.
गुलमंडीसाठी मल्टिस्टोरेज पार्किंग
गुलमंडीसारख्याभागात वाहनतळांची व्यवस्था करण्याची सूचना व्यापारी विलास साहुजी यांनी केली. तसेच शहरात सायकलिंग ट्रॅक तयार करून आठवड्यातून एक दिवस सायकलवरच प्रवास निश्चित करण्याची मागणी अनंत मोताळे यांनी केली. यावर गुलमंडीसाठी मल्टिस्टोरेज पार्किंग करून जालना रस्त्यावरही अशी पार्किंग उभारू, असे बकोरिया यांनी सांगितले.