आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'लोक प्रेमाने सांगून कर भरत नाहीत'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - प्रेमाने सांगून नागरिक कर भरतच नाहीत, म्हणून आम्हाला जबरदस्ती करावे लागते, असे विधान करत उपायुक्त शिवाजी झनझन यांनी शहरातील करदात्या नागरिकांवर ठपका ठेवला. त्यांच्या या विधानाने सभापतींसह सगळी स्थायी समिती संतापली. रांगा लावून कर भरणारे नागरिक मूर्ख आहेत का? नागरिकांचा अपमान कराल तर याद राखा, आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असे सदस्यांनी ठणकावले, तर डोके शांत ठेवून बोलत चला, बोलण्याआधी जरा विचार करा, असे ‘लसीकरण’ सभापती नारायण कुचे यांनी केल्यानंतर झनझन यांनी आपले शब्द मागे घेत माफी मागितली.
मंगळवारी झालेल्या बैठकीत सर्वच नगरसेवक झनझन यांच्यावर तुटून पडले.

मीर हिदायत अली यांनी कर आकारणी विभागाने ड वॉर्डात फक्त 18 नव्या मालमत्ता शोधल्या, असा आरोप केला. समीर राजूरकर यांनी झनझन यांच्या आधीच्या अधिकार्‍यांच्या काळात वर्षभरात 11 हजार 78 नव्या मालमत्ता शोधण्यात आल्या होत्या, झनझन यांच्याकडे चार्ज आल्यावर वर्षभरात 4 हजार 169 मालमत्ता शोधून कर आकारण्यात आला. त्यांना मालमत्ता शोधण्यात अपयश आले, असा आरोप त्यांनी केला. सुरेंद्र कुलकर्णी यांनी करवसुली कर्मचारी कर भरणार्‍या नागरिकांशी उद्धट वागतात असा आरोप केला. त्यावर झनझन यांनी प्रेमाने सांगून लोक कर भरतच नाहीत, असे विधान केल्याने सगळेच सदस्य संतापले. त्यांनी या विधानाला आक्षेप घेतला. राजूरकर, विकास जैन, मीर हिदायत अली, आगा खान, कुलकर्णी, प्रीती तोतला, जगदीश सिद्ध यांनी आवाज उठवला. सभापती नारायण कुचे यांनी बैठक पाच मिनिटांसाठी तहकूब केली.


शहर अभियंता पानझडेंची मध्यस्थी
झनझन यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडावा, असा सदस्यांचा निर्णय होत असतानाच शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी मध्यस्थी केली व वातावरण शांत केले.