आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • People Own Solve The Problem Of Corruption And Terrorism Says Rss Chief Mohan Bhagwat

भ्रष्टाचार, दहशतवादावर लोकांनीच उपाय शोधावा; मोहन भागवत यांचे आवाहन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- रोज भ्रष्टाचार, बलात्काराची प्रकरणे उघडकीस येत आहेत. 24 तास चर्चा करावी, असे नकारात्मक घडत आहे, बंगळुरूसारखे बॉम्बस्फोट घडत आहेत. याला सरकार, प्रशासन जेवढे जबाबदार आहे तेवढीच जबाबदारी लोकांवरही येते. जसे आपण तसे आपले प्रतिनिधी, त्यामुळे परिस्थितीवर लोकांनीच उपाय शोधला पाहिजे, असे आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.

रा. स्व. संघाच्या वतीने मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर आयोजित वर्ष प्रतिपदा उत्सवात ते बोलत होते. भागवत म्हणाले की, आज देशाच्या परिस्थितीची नकारात्मक चर्चा होताना दिसते. रोज 24 तास चर्चा व्हावी, असे घडतही आहे.

भ्रष्टाचार, बलात्काराची प्रकरणे रोज समोर येत आहेत. देश भेदांनी पोखरलेला आहे. प्रत्येक गोष्टीसाठी सरकारकडे डोळे लावणारा समाज न होणा-या गोष्टींसाठी सरकारला शिव्या घालताना दिसतो. देशाच्या सीमा सुरक्षित नाहीत. भारत वर येऊ नये यासाठी कारवाया करणा-या शक्ती देशात आणि देशाबाहेरून राजरोस खेळ करीत आहेत. त्यांना आळा घालण्यात येत असल्याचे कुठे दिसत नाही. मागे हैदराबादेत झाले, आज बंगळुरूत बॉम्बस्फोट झाले. त्याची चिंता सगळे व्यक्त करतात; पण बंदोबस्त होताना दिसत नाही. याला सरकार आणि प्रशासन जबाबदार असले तरी ही जबाबदारी लोकांवरही येते. कारण जसे आपण तसे आपले प्रतिनिधी. त्यामुळे या परिस्थितीवर उपाय शोधला पाहिजे, असे ते म्हणाले.

या वेळी व्यासपीठावर शहर संघचालक डॉ. उपेंद्र अष्टपुत्रे, प्रांत संघचालक अ‍ॅड. गंगाधर पवार, शहर सहसंघचालक देवानंद कोटगिरे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर कार्यवाह डॉ. दिवाकर कुलकर्णी यांनी केले.


शहामृगासारखे वागू नका
भागवत म्हणाले की, देशाची परिस्थिती म्हणजे आपल्यावर ओढवलेली परिस्थिती आहे, हे समजून घेतले पाहिजे. शहामृगासारखे वाळूत तोंड खुपसून बसण्याने संकट टळत नाही. आज परिस्थिती बिकट वाटेल, पण ही आजची स्थिती नाही. वर्षानुवर्षे हेच सुरू आहे. परिस्थितीला नामोहरम करून संपवण्याची ताकद आपण कमावलेली नाही. अशा परिस्थितीत संघ स्वयंसेवकांनी अधिक सक्रिय होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. देशाला संपन्न, बलशाली आणि विश्वगुरू करण्यासाठी एकतेचे सूत्र देणा-या हिंदुत्वाचा अंगीकार करण्याची गरज आहे. हिंदुत्व ही पूजा पद्धती नसून ती आपली ओळख आहे, पुरुषार्थाचा उगम आहे. त्यामुळे हिंदुत्व सर्वांना जोडू शकते, असेही ते म्हणाले.

संघाच्या मैदानावर या
तासाभराच्या भाषणात सरसंघचालकांनी सामान्यांनाही आवाहन केले. ते म्हणाले की, इतर नागरिकांनी दर्शक, सहानुभूतीदार राहू नये. संघाच्या मैदानावर यावे. समाजहिताचे जमेल तेवढे काम सुरू करावे. संघ समाजाचे सेवा कार्य करतो. त्या कार्याचे पाईक व्हा.