आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॉगिंग ट्रॅक, गार्डन, हास्य क्लबमध्ये ‘आप’ची सदस्य नोंदणी जोरात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - दिल्लीत यश मिळवल्यानंतर आम आदमी पक्षाने राज्यातही पक्ष बळकटीकरणाला सुरुवात केली आहे. ‘आप’कडून सदस्य नोंदणी सुरू करण्यात आली आहे. औरंगाबाद शहरातही हे अभियान सुरू असून जॉगिंग ट्रॅक, उद्याने, हास्य क्लब या मध्यमवर्गीय गर्दी करणार्‍या सार्वजनिक ठिकाणी जाऊन सदस्य नोंदणी केली जात आहे, असे चित्र शुक्रवारी शहरात दिसले.

देशातील सर्वात मोठा राष्ट्रीय पक्ष असणार्‍या काँग्रेसचे नोंदणी शुल्क तीन रुपये, भाजपचे पाच तर ‘आप’चे शुल्क दहा रुपये असल्यामुळे इतरांच्या तुलनेत ‘आप’चे नोंदणी शुल्क थोडे जास्त आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने प्रचार करताना वेगवेगळे फंडे वापरले होते. आता राज्यातही सदस्य नोंदणीसाठी आपकडून अनोखा फंडा वापरला जात आहे. मॉर्निंग वॉक करणार्‍या नागरिकांना ‘आप’चे सदस्य भेटतात. त्यांना पक्षाची ओळख करून सदस्य होण्याचे आवाहन करतात. नागरिक स्वत:हून दहा रुपये देत पावती घेत आपचे सदस्य बनत आहेत. हे सदस्य शुल्क तीन वर्षांसाठी असेल. मागील तीन दिवसांत सुमारे एक हजार नागरिक या नव्या पक्षाचे सदस्य झाले आहेत.

पाच हजार सदस्यसंख्येचे उद्दिष्ट
पक्षाची सदस्य नोंदणी करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी पाच हजार सदस्यांच्या नोंदणीचे उद्दिष्ट असून दीड हजार सक्रिय कार्यकर्ते तयार व्हावेत, अशी अपेक्षा आहे. सदस्य नोंदणी शुल्क फक्त दहा रुपये असून इतर पक्षांसारखे कमी पैसे घेऊन कोट्यवधींचा भ्रष्टाचार करणारा आमचा पक्ष नाही. हरमित सिंग, सचिव, आम आदमी पक्ष

टोपी ही पक्षाची ओळख
आम आदमी पक्षाची टोपी ही त्यांची ओळख बनली आहे. सकाळी 6.30 वाजता फिरायला जाणार्‍या लोकांना आपचे कार्यकर्ते सदस्य नोंदणीसाठी विचारत असताना टोपीमुळे त्यांची ओळख आणि वेगळेपण लक्षात येते. त्यामुळे नागरिकही उत्साहात सदस्य बनत असल्याचे आपच्या नूतन सदस्य मनीषा चौधरी म्हणाल्या.

हौसेमुळे लोक ‘आप’कडे
काँग्रेस केवळ तीन रुपये घेऊन सदस्य नोंदणी करते. सध्या ग्लॅमर असल्यामुळे हौसेने लोक तिकडे जात आहेत. मात्र त्याचा फारसा फरक पडणार नाही. प्रत्यक्षात ते काय करणार हे लवकरच दिल्लीत कळणार आहे. अरुण मुगदिया, प्रदेश सरचिटणीस, काँग्रेस

‘आप’चा परिणाम नाही
तीन महिन्यांपूर्वीच आम्ही 36 हजार सदस्यांची नोंदणी केली. पाच रुपये घेऊन सदस्य नोंदणी करतो. येथील प्रश्न वेगळे असल्यामुळे त्यांच्या नोंदणीमुळे विशेष फरक पडणार नाही. बापू घडामोडे, शहराध्यक्ष, भाजप