आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Peopls Preparing For The Deletion Of Some Religious Works, Divya Marathi

शहरातील धार्मिक बांधकामे हटवण्याची काहींची तयारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - धार्मिक अतिक्रमणे नागरिकांनी आपणहून काढून घ्यावीत यासाठी मनपाने प्रयत्न सुरू केले असून त्याला प्रतिसाद देत कैलासनगरातील दोन छोटी मंदिरे व एक दर्गा आपणहून हटवण्याची तयारी संबंधितांनी दर्शवली आहे. दुसरीकडे मनपाच्या मोहिमेला हिंदू आणि मुस्लिम असा दोन्हींकडून विरोध वाढत असून आज 14 जणांचे लेखी आक्षेप अर्ज मनपाकडे आले आहेत. त्यावर विचार करून मनपाला कारवाईचा निर्णय घ्यावा लागणार आहे.

उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार 31 मेपर्यंत रस्ता रुंदीकरणाच्या आड येणारी धार्मिक अतिक्रमणे काढण्याचे काम मनपा प्रशासनाला पोलिसांच्या मदतीने करावयाचे आहे. पोलिस तयार आहेत, पण मनपाची तयारी बाकी आहे. अतिक्रमणे हटवण्याला दोन्ही बाजूंकडून होणारा विरोध तीव्र असल्याने कारवाई कशी करायची, असा मनपासमोर प्रश्न उभा राहिला आहे. त्यासाठी मागील तीन दिवसांपासून बैठकांवर बैठका सुरू आहेत. आजही मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात दिवसभर बैठका घेतल्या. सकाळी काही मुस्लिम धर्मगुरू, नगरसेवक व प्रतिष्ठितांनी आयुक्तांची भेट घेत कायदेशीर बाबींची पडताळणी केल्याशिवाय कारवाई करण्यास तीव्र विरोध केला. अशी कारवाई केल्यास शहरातील वातावरण बिघडू शकते म्हणून मनपाने पूर्ण खात्री करूनच पाऊल उचलावे, असा सल्लाही त्यांनी दिला. या बैठकीला शहागंज मशिदीचे इमाम मौलाना मुजिबुल्ला, रशीद मदनी, रझा अकॅडमीचे साजेद रझा, मुस्लिम नुमाइंदा कौन्सिलचे ओवेस अहमद, मेराज सिद्दिकी, मोइजोद्दीन फारुकी, नगरसेवक मीर हिदायत अली, अफसर खान, जावेद कुरेशी यांची उपस्थिती होती.

आज शिवसेनेची बैठक : दरम्यान, मनपाच्या या मोहिमेबाबत उद्या दुपारी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. सर्मथनगरातील प्रचार कार्यालयात होणार्‍या या बैठकीत खासदार चंद्रकांत खैरे भूमिका मांडणार आहेत. त्यात आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाट, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यासह पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

काही बांधकामे आपणहून काढणार : आयुक्त म्हणाले की, नागरिकांनी व संबंधितांनी आपणहून ही बांधकामे काढून घ्यावीत, असे आमचे आवाहन आहे. सात-आठ जणांनी तशी तयारी दर्शवली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कैलासनगरातील दोन छोटी मंदिरे व दग्र्याशी संबंधितांनी आपणहून बांधकाम काढून घेण्याची तयारी दर्शवली आहे.

14 आक्षेप आले
मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे म्हणाले की, मनपाकडे आतापर्यंत 14 आक्षेप आले आहेत. त्यात भूसंपादनाबाबतचे विषय आहेत. कायद्यानुसार काय करता येईल याची पडताळणी करून कारवाई करू. या कारवाईबाबत दबाव येत आहे का, असे विचारले असता त्यांनी मनपा दबावात काम करत नाही, असे सांगत दबाव येत असल्याचे स्पष्ट म्हटले नाही.