आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गल्लीबोळात मधुशाला जोरात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सगळे नियम धाब्यावर बसवत शहरातील नागरी वसाहतींसोबतच शाळा, महाविद्यालये, पोलिस ठाणी आणि धार्मिक स्थळांच्या अगदी जवळ दारू दुकानांचे जाळे पसरले आहे. शिवाय अनेक हॉटेलांमध्ये परवाना नसतानाही खुलेआम दारू विक्री केली जात आहे. अगदी गल्लीबोळातही दारूची दुकाने आणि अवैध दारू पुरवणारी हॉटेल्स आहेत. टार्गेट पूर्ण होण्यासाठी व उत्पन्न वाढवण्यासाठी अधिकार्‍यांनी दारू दुकानांची ही खैरात वाटली. वेळेच्या बंधनाकडे दुर्लक्ष केले, अवैध विक्रीकडे कानाडोळा केला. त्यामुळे नागरिक तळीरामांमुळे त्रस्त झालेत.


पूर्वी शहराच्या बाहेर नागरी वसाहतीपासून दूर एखादे दारूचे दुकान असायचे, पण आता पावलापावलावर तुम्हाला दारूचे दुकान वा बार हमखास दिसतो. त्यातून अपार्टमेंट, कॉलनीमध्ये, मंदिर, शाळा, महाविद्यालय परिसरात आणि हे कमी म्हणून की काय, थेट पोलिस ठाण्यांना खेटून बार थाटलेले दिसतात. महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या असंख्य तक्रारींनंतर पाहता चमूने शहरातील बिअर बार आणि हॉटेल्सची पाहणी केली. त्यात अनेक हॉटेल्समध्ये खुलेआम बेकायदा दारूची विक्री होत असल्याचे दिसून आले. शिवाय परवाना देताना कोण कुठे बार सुरू करत आहे याची पाहणी करण्याची तसदीही उत्पादन शुल्क विभागाने घेतलेली नाही.

200 परमिट रूम, 25 वाइन शॉप
200 परमिट रूम, 25 वाइन शॉपी आणि तब्बल 40 देशी दारूची दुकाने आहेत. उत्पादन शुल्क विभागाने शहराचे चार भाग केले आहेत. ए-1, ए-2, बी-1, बी-2 असे ते विभाग आहेत. त्यानुसार परमिट रूम, वाइन शॉप, बिआर बार व देशी दारू दुकानांचे वाटप केले आहे. ए-1 भागात रेल्वेस्थानक ते गुलमंडी व पुढे पडेगाव ते दौलताबाद असा भाग येतो. यात 41 परमिट रूम, पाच वाइन शॉप, 8 देशी दारू दुकाने, 4 बिअर शॉप येतात. ए-2 भागात रेल्वेस्टेशन ते मोंढा, मोंढा, सेव्हन हिल्स, नाका ते गारखेडा परिसर येतो. या भागात 60 परमिट रूम, 11 देशी दारूची दुकाने, 8 वाइन शॉप आणि 4 बिअर बार आहेत. बी-1 भागात सिडको-हडकोचा भाग येतो. या भागात सर्वाधिक 34 परमिट रूम, 9 बिअर बार, 8 देशी दारूची दुकाने, 3 वाइन शाइन शॉप आहेत. बी-2 भाग वाळूज परिसर येतो. यात 47 परमिट रूम, 10 देशी दारू दुकाने, 12 बिअर शॉप, 4 वाइन शॉप आहेत.

विभागाबरोबर शहराचा महसूल
औरंगाबाद जिल्ह्यातून वर्षाला तब्बल 1400 कोटी रुपयांचा महसूल यातून मिळतो. दुसरीकडे जालना, परभणी, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद या मराठवाड्यातील विभागाचा एकत्र महसूल 1300 कोटींवर जातो, तर एकट्या औरंगाबाद विभागाचा 1400 कोटी महसूल आहे. याच विभागात कारखाने असल्यानेही महसूल वाढला आहे.

टार्गेट पूर्ण करण्यासाठीच..
शहरातील चारही झोनमध्ये 75 मीटरच्या नियमाचे पालन होत नाही. शाळा, महाविद्यालये, धार्मिक स्थळे किंवा नागरी वसाहती यांच्यापासून दारूची दुकाने किमान 75 मीटर लांब हवीत असा शासनाचाच नियम आहे. मात्र, शासकीय अधिकार्‍यांनी टार्गेट पूर्ण करण्यासाठी दारूच्या दुकानांचे परमिट गल्लीबोळातही वाटल्याने जिथे-तिथे मधुशाला तयार झाल्या आहेत. त्यामुळे महिला व मुलींची कुचंबणा होते.

रात को बारा बजे दिन निकलता है
वाइन शॉपची दुकाने रात्री 9 पर्यंत, तर परमिट रूम, बार व इतर दारूची दुकाने रात्री साडेदाहापर्यंत सुरू असावीत, असा नियम आहे. पण औरंगाबादेतील परमिट व बार रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. रात्री अकरा ते साडेअकरा वाजता पोलिसांचा राउंड सुरू होतो तेव्हा या दुकानांचे शटर्स अर्धे खाली ओढले जातात. काही महाभागांनी तर मागच्या बाजूने एन्ट्री तयार केली आहे. त्यामुळे रोज पहाटेपर्यंत मधुशाला सुरू असतात. लोकसंख्या वाढीच्या तुलनेत परवाना फी असल्याने शहरात बार-वाइन शॉपला जास्त पैसे मोजावे लागत आहेत. त्यातून मार्ग काढण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने खास सूट दिल्याचे दिसते. पोलिसही मेहेरबान आहेत.