आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीच्या उपचारासाठी रुग्णालयात निघालेल्या वृद्धाला टेम्पोने उडवले, औरंगाबाद-नगर महामार्गावर अपघात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - पत्नीच्या उपचारासाठी दुचाकीवरून रुग्णालयात निघालेल्या वृद्धाचा टेम्पोच्या धडकेने मृत्यू झाला. औरंगाबाद-नगर महामार्गावरील बजाज ऑटो कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर शुक्रवारी (१५ सप्टेंबर ) सकाळी १०.३० च्या सुमारास हा अपघात झाला.
 
अशोक जनार्दन लघाने (५८, रा. वळदगाव रोड, पंढरपूर) असे मृताचे नाव असून या अपघातात त्यांच्या पत्नी सिंधूबाई गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. दरम्यान, वाळूज पोलिसांनी टेम्पोचालकाला ताब्यात घेत सातारा पोलिसांच्या स्वाधीन केलेे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंढरपूर येथील रहिवासी अशोक लघाने हे शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास आजारी पत्नी सिंधूबाई यांना घेऊन गंगापूर येथील रुग्णालयाच्या दिशेने दुचाकीने (एमएच २० डीएच ५६९०) निघाले होते. त्यांची दुचाकी बजाज कंपनीसमोर येताच भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने (एमएच १६ सीसी ६५५५) दुचाकीला मागून जोरात धडक दिली. त्यात दुचाकीवरील पती-पत्नी रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. अपघात होताच बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली खरी, मात्र कोणीही मदतीला धावून आले नाही. 
 
महामार्ग बनला मृत्युमार्ग : औरंगाबाद-नगर महामार्गावर गत आठ महिन्यांत म्हणजेच जानेवारी ते २४ ऑगस्ट यादरम्यान तब्बल ७९ अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये ३२ जण ठार झाले असून १२ जणांना कायमचे अपंगत्व आले आहे. या महामार्गावर अखेरचा अपघात २४ ऑगस्ट रोजी झाला होता. त्यानंतर शुक्रवारी झालेल्या अपघातात पुन्हा एकाचा मृत्यू झाला.
 
अपघाताची माहिती मिळताच सातारा ठाण्याचे पोलिस हेडकॉन्स्टेबल पी. व्ही. मोरे तसेच सिडको वाळूज वाहतूक शाखेचे पोलिस कॉन्स्टेबल अनिल भुसेवाड, संजय पाटील यांनी अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेऊन पळ काढण्याच्या तयारीत असणाऱ्या टेम्पो चालकाला शिवराई येथील पथकर नाक्याजवळून ताब्यात घेतलेे. अपघातग्रस्तांना मदत करता टेम्पोसह पळ काढणारा चालक दिगंबर पवार (रा.हिप्परगा, ता. लोहा, जि. नांदेड) याला वाहतूक शाखेच्या पोलिसांनी पकडून प्रथम वाळूज नंतर सातारा पोलिसांच्या स्वाधीन केले. मृत अशोक लघाने यांच्यावर शुक्रवारी सायंकाळी पंढरपूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 
 
रिक्षाचालकाने केली मदत 
अपघातग्रस्तांना कुणीच मदत करत नसल्याचे पाहून रिक्षाचालक पुंजाराम प्रधान कैलास देशमुख, राजू काळे, दीपक कानडे यांनी गंभीर जखमी झालेल्या लघाने दांपत्याला अॅपेरिक्षातून घाटी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी अशोक लघाने यांना तपासून मृत घोषित केले, तर गंभीर जखमी सिंधूबाई यांच्यावर उपचार सुरू केले. 
धडक देणारा टेम्पो आणि लघाने यांची ही दुचाकी. 
 
बातम्या आणखी आहेत...