आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर "पेट' परीक्षेचा निकाल जाहीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- कधी प्रश्नपत्रिकेतील चुका, तर कधी प्रश्नपत्रिकेशिवायच संकेतस्थळावर आलेली अ‍ॅन्सर की या सर्व गोंधळात हो नाही, हो नाही म्हणत अखेर गुरुवारी पेट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. निकाल लागला खरा; पण आता पात्र गाइड मिळतील का, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने पीएचडी प्रवेशपूर्व पात्रता परीक्षा (पेट) 28 सप्टेंबर रोजी घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल दहा दिवसांत लावण्याचा दावा विद्यापीठ प्रशासनाने केला होता. दहाव्या दिवशी विद्यापीठाने अ‍ॅन्सर की संकेतस्थळावर प्रकाशित केली खरी; परंतु त्यात असंख्य चुका आहेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यांच्याकडून प्रश्नपत्रिका परत घेतल्या. त्यामुळे उत्तरे कशी शोधावीत, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला.
परीक्षेसाठी 9 हजार 230 उमेदवारांनी नोंद केली होती. त्यापैकी पहिला पेपर 5 हजार 818 जणांनी दिला होता. त्यापैकी 3 हजार 703 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर दुसऱ्या पेपरमध्ये 5 हजार 805 जणांनी परीक्षा दिली. त्यापैकी 2 हजार 895 जण उत्तीर्ण झाले आहेत. पहिल्या पेपरचा निकाल ६३ टक्के आणि दुसऱ्या पेपरचा निकाल हा 49 टक्के लागला आहे.पेट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका देण्यात आलेल्या नाहीत. मात्र, कुलगुरूंशी चर्चा करून पुढील वर्षी प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात येतील, अशी माहिती बीसीयूडीचे संचालक डॉ. के. व्ही. काळे यांनी दिली.